नागपूर : कर्जमाफी हा अंतिम उपाय नसून हे महत्वाचे पाऊल आहे मात्र त्यासोबतच शेतीतील गुंतवणूक वाढविणे गरजेचे असून गेल्या तीन वर्षापासून शासन या दिशेने प्रयत्न करीत आहे. यापुढेही शेती क्षेत्रातील गुंतवणूक कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार मा.गो. वैद्य, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजीत, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख, किरण नाईक, सिध्दार्थ शर्मा व योगेश कोरडे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा एकूण 89 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी समृध्द करावयाचा असेल तर शेतीतील गुंतवणूक वाढविणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षात शासनाने सिंचन विहिर, शेततळे, व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतीतील गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला आहे. ही गुंतवणूक अशीच सुरु राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
कर्जमाफीचा निर्णय हा धाडसी असून या निर्णयाचा ताण पुढील तीन चार वर्ष राज्याच्या अर्थव्यवस्थेवर राहणार आहे, असे असले तरी शासन तो कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आंध्रप्रदेशने ज्याप्रमाणे बँकांच्या सहकार्याने आर्थिक समस्यावर उपाय शोधले त्याच धर्तीवर आम्ही विचार करीत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीच्या निर्णयावर टीका करण्यापेक्षा हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत योग्य प्रकारे कसा पोहचेल याचा सर्वांनी विचार करावा, असेही ते म्हणाले.
पत्रकारिता ही विश्वासार्हेतेवर अवलंबून असते विश्वासार्हेता संपली तर लोकशाहीला धोका निर्माण होतो. ‘समजले की सांगून द्यायचे’ या वृत्तीमुळे माहितीच्या सत्यतेची पडताळणी न करता देण्यात येणाऱ्या बातम्यामुळे विश्वासार्हेतेला तडा जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सोशल मिडीया व ऑनलाईन मिडीयामध्ये या बाबी अधिक प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मा.गो. वैद्य यांच्या विषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, बाबुरावजी ही एक संस्था असून ते व्रतस्थ जीवन जगत आले. प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. भाषेच्या शुध्दीचा आग्रह धरणारे बाबुरावजी एकमेव असतील असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. पत्रकारांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करुन वेगाने निर्णय घेतले जातील असे ते म्हणाले. अन्य पुरस्कार्थीचा व त्यांच्या वैयक्तिक कामगिरीचा उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला.
पत्रकारांनी विश्वासार्हेता जपण्याबरोबरच व्यवसाय आणि धर्म यातील फरक समजून घ्यावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ज्या माहितीला सत्याचा आधार नसतो ती माहिती खातरजमा न करता दिल्यास विश्वासार्हेता संपते. पत्रकारांनी ही बाब आवार्जून लक्षात ठेवावी. प्रत्येकाने आदर्श वागायचा प्रयत्न केला तर लोकशाही अधिक मजबूत होईल असे ते म्हणाले. अलिकडच्या काळात पत्रकारिता वेगवान होत चालल्याने प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, माहितीची शाहनिशा न करता वृत्त देणे टाळावे. यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हेता वाढेल. गडकरी यांनी मा. गो. वैद्य यांच्या कार्याचा गौरव केला.
मराठी पत्रकार परिषद मुंबईच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार मा.गो. वैद्य यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. राजन वेलकर यांना दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार, विनोद जगदाळे यांना स्व. शशिकांत सांडभोर पुरस्कार, कार्तिक लोखंडे यांना स्व. प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार, रश्मी पुराणिक यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, गो.पी. लांडगे यांनी भगवंत इंगळे स्मृती पुरस्कार, चंद्रकांत सामंत यांना रावसाहेब गोगटे पुरस्कार, गजानन जानभोर यांना ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार, सुनिल चावके यांना आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार, गोपाळ साक्रीकर यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कर देवून गौरविण्यात आले.
सत्कारला उत्तर देतांना मा.गो. वैद्य म्हणाले की, पत्रकार निर्भय असला पाहिजे. तो केवळ एकाचीच बाजू मांडणारा नसावा. सरकारवर अंकूश ठेवण्यासोबतच सामान्य लोकांना काय वाटते हे पत्रकाराने सांगितले पाहिजे. पुरस्काराच्या रक्कमेत 11 हजार रुपये वैयक्तिक भर घालून सेवाकार्याला देण्याची घोषणा मा.गो. वैद्य यांनी केली. सरकार आणि पत्रकार हे परस्परांचे मित्र नसावे तर प्रतिस्पर्धी असावे, असे सांगून मा.गो. वैद्य म्हणाले की. ही स्पर्धा निकोप व लोकहिताची असावी.
ग्रामीण पत्रकार हाच खरा पत्रकारितेचा आत्मा असल्याचे श्रीपाद अपराजीत यांनी सांगितले. जयभीमची घोषणा देणारे बाबू हरदास हे नागपूरचे असून त्यांचा नागपुरात पुतळा असावा, त्याचप्रमाणे ग.त्र्यं. माडखोलकर यांचा विमानतळ चौकात पुतळा असावा आणि गर्जा महाराष्ट्र माझा गीत लिहणारे नागपूरचे राजा बढे यांचे नाव नागपूरातील एखादया चौकास द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाली भाषेचा प्रचार व प्रसार करणारे धर्मानंद कोसंबी यांची सेवाग्रामजवळील समाधी उपेक्षीत असून यासाठी शासनाने लक्ष घालावे, अशी अपेक्षा अपराजीत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
मराठी पत्रकार संघाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल हवेली तालुका, दिंडोरी, अकोट, जिंतूर, तासगाव, धाबोली, रामटेक व कळंब या तालुक्यांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा पत्रकार संघास स्व. रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पुरस्कार देण्यात आला. एस.एम. देशमुख लिखीत कथा एका संघर्षाची या पुस्तकाचे विमोचन मुख्यमंत्री यांचे हस्ते करण्यात आले.
पत्रकार हल्ला विरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे एस.एम. देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले. हा कायदा केल्याबद्दल देशमुख यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानले. पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्य योजनेतील अधिस्वीकृतीधारक ही अट रद्द करुन सरसकट लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.