शेती नावावर न केल्याने आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

रावेर तालुक्यातील मोरगाव गावातील संतापजनक घटना

रावेर : शेत जमीन नावावर करून न दिल्याने एका कुपुत्राने स्वत:च्याच आईला जिवंत पेटून दिल्याची घटना रावेर तालुक्यातील मोरगांव येथे घडली. या घटनेत आई गंभीर भाजली असून तिच्यावर रावेर ग्रामीण रग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.

आईला पेटवणार्‍या कुपूत्राविरुद्ध गुन्हा
रावेर तालुक्यातील मोरगांव खुर्द येथील सुगंधा पांडुरंग पाटील (70) या मुलगा नवल पाटील (42) याच्यासह राहतात. सुगंधा पाटील यांच्या नावावर शेतजमीन असून ती आपल्या नावावर करण्यासाठी नवल पाटील याने आग्रह धरला होता शिवाय संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळण्यासाठी तो आईला सतत त्रास देत होता. आईने या गोष्टीस नकार दिल्याने शुक्रवारी मध्यरात्री बारा नंतर संप्तत झालेल्या नवल पाटीलने आईच्या अंगावर पेटवलेल्या पॉलीथीनच्या पिशव्या टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्या रागात त्याने घरालाही आग लावली. या घटनेत आई सुगंधा पांडुरंग पाटील गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी एन.डी.महाजन यांनी उपचार केले. सुगंधा पांडुरंग पाटील यांच्या फिर्यादीनुसार मुलगा नवल पाटीलविरुध्द भादंवि कलम 307, 324, 436, 336, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फौजदार मनोहर जाधव करीत आहेत.