डॉ. लाखनसिंग : महाराष्ट्र, गुजरातमधील शेतकर्यांसाठी कार्यशाळा
नारायणगाव । शेतकरी हा स्वतः संशोधक आहे, तो नेहमीच शेतीमध्ये विविध प्रयोग करत असतो. अशा प्रकारचे प्रयोग एकत्रीत करून त्याला आयसीएआर स्तरावर मान्यता मिळविणे व त्याला प्रसिद्धी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन पुणे येथील कृषी तंत्रज्ञान अवलोकन व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. लाखनसिंग यांनी केले.
आयसीएआर अटारी पुणे आणि ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हाराष्ट्र व गुजरात राज्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणार्या निवडक अभिनव शेतकर्यांची कार्यशाळा नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. प्रकाश पाटे, रविंद्र पारगावकर, डॉ. डी. व्ही. कोळेकर, प्रशांत शेटे, डॉ. लालसाहेब तांबडे आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
विभागस्तरावर कार्यशाळा
विविध जिल्ह्यामधून आलेल्या निवडक अभिनव शेतकर्यांनी विकसीत केलेले नावीन्यपूर्ण संशोधन सर्व स्तरातील घटकापर्यंत पोहोचविण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन विभागस्तरावर करण्यात येत असून त्याचा लाभ सर्व सामान्य शेतकर्यांना होईल, असा विश्वास डॉ. लाखनसिंग यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकर्यांच्या समशोधनाचे मूल्यमापन करा
शेतकरी नेहमीच संशोधन करत असतात. परंतु त्याचे पेटंट घेता येत नसल्यामुळे शेतकर्यांचा मोठा तोटा होतो आणि त्याचा फायदा खाजगी कंपन्यानी घेतलेला दिसतो. तेच तंत्रज्ञान शेतकर्यांना रॉयल्टी भरून विकत घ्यावे लागते. यासाठी शेतकर्यांनी विकसीत केलेल्या संशोधनाचे मूल्यमापन करून शासन स्तरावर त्याचे डॉक्युमेंटेशन व्हावे, अशी सूचना अनिलतात्या मेहेर यांनी यावेळी केली.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अभिनव शेतकर्यांनी त्यांनी संशोधित केलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले. यावेळी डॉ. लालासाहेब तांबडे, डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकर्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशांत शेटे यांनी केले. सूत्रसंचलन राहुल घाडगे तर आभार डॉ. डी. व्ही. कोळेकर व योगेश यादव यांनी मानले.