पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा शेतीचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजतात, असे प्रतिपादन करत राज्यातील भाजप सरकारमधील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांनाच लक्ष्य केले. शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भूवयाही उंचावल्या आहेत.
परिवर्तन युवा परिषदेत शनिवारी ‘तरुणांनी राजकारणात यावे का?’ या विषयावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राजू शेट्टी यांची भूषण राऊत यांनी मुलाखत घेतली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यापैकी शेतीचे प्रश्न कोणाला अधिक समजतात,’ असे शेट्टी यांना विचारण्यात आले. त्यावर, पवार यांना शेतीचे प्रश्न जास्त समजतात, असे शेट्टी यांनी सांगितले. पवार यांच्याविरोधात अनेक वेळा आंदोलन करणारे शेट्टी यांनी पवार यांचे कौतुक केल्यानेही जोरदार चर्चा रंगली आहे.
एक मेपासून आंदोलन
शेतकर्यांच्या प्रश्नासाठी कायम लढत आलो आहे. शेवटपर्यंत लढा देणार आहे. गेल्या वर्षी शेतकर्यांसाठी ऋणमुक्त अभियान हाती घेतले होते. 1 मेपासून शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी तीव्र लढा उभारणार आहे, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
…तर तुम्हीही एसी वापरू नका!
मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेतल्याने विरोधाला सामोरे जावे लागले, अशी खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. गेल्या महिन्यात विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर सत्ताधारी भाजपने केलेली टीका योग्य नाही. संघर्ष यात्रेसाठी पहिल्यांदाच सर्व विरोधक एकत्र आले आहेत. आम्ही वातानुकूलित बसमधून प्रवास केला, यावर भाजपनेच अधिक चर्चा आणि टीका केली. भाजपने काढलेल्या संघर्ष यात्रांविषयी आम्हाला चांगलेच माहिती आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री विनोद तावडे यांनी वातानुकूलित वाहनांतून जाणे बंद करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.