शेती महामंडळाच्या तक्रारींसदर्भात आढावा बैठक

0

बारामती । शेती महामंडळाकडील तक्रारींसदर्भात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खंडकरी शेतकर्‍यांना वाटप करावयाच्या शिल्लक 18 प्रकरणांचा प्रकरणनिहाय आढावा घेऊन 5 प्रकरण निर्णय घेऊन निकाली काढण्यात आली. यावेळी इंदापूर येथील खंडकरी शेतकरी, मृत खंडकरी शेतकर्‍यांचे कायदेशीर वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निकम यावेळी म्हणाले, वालचंदनगर येथे दर महिन्याला खंडकरी शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठक घेण्यात येईल. ज्या खंडकरी शेतकर्‍यांच्या वाटप केलेल्या जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यांची शासकीय मोजणी करून लवकरच ती हटविण्यात येणार आहेत. खंडकरी शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून शेती महामंडळाकडे प्रलंबित असलेली जमिनीविषयक प्रकरणे तात्काळ बैठक घेऊन मार्गी लावणार असल्याची माहिती निकम यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी खंडकरी शेतकर्‍यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. उपस्थितांनी प्रलंबित मागण्या लवकर निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त केली.