शेती विकत घेण्याच्या कारणावरुन एकास मारहाण

0

धुळे । शेती विकत घेण्याचे वाईट वाटून एकास लोखंडी एंगलने मारहाण करुन जखमी केल्याची घटना जैताणे, ता. साक्री शिवारात घडली आहे. यावेळी अन्य एकास शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याचीही धमकी देण्यात आली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील जैताणे गावातील रहिवासी कैलास सुकलाल भदाणे (41) हे शेतजमीन विकत घेणार होते, याचे वाईट वाटून भगवान गंगाराम कुवर रा. जैताणे यांनी कैलास भदाणे यांना हातातील लोखंडी एंगलने उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ वार करुन जखमी केले यावेळी भदाणेंचा भाचा राजेश नागू बागूल यांनादेखील शिवीगाळ करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. 4 रोजी सायंकाळी 5 वाजता जैताणे गावाच्या शिवारातील बाबा का ढाबाच्या बाजूला असलेल्या शेतात घडली. याप्रकरणी कैलास भदाणे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भगवान कुवर यांच्याविरुध्द भादंवि कलम 324 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने भामपुरात तरुणास मारहाण
शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर गावातील रहिवासी राहुल पुंडलिक पाटील (26) हा तरुण गावात बदनामी करतो, असा संशय घेऊन त्यास दि.3 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गावातील रितेश विश्‍वास देवरे यांच्या घरात रितेश देसले, मुकेश विश्‍वास देसले, ज्ञानेश्‍वर विश्‍वास देवरे, भीमराव बाळू पाटील, तुषार बाळू पाटील, पप्पू बाळासाहेब चंद्रकांत पाटील, संदीप गजानन पाटील सर्व रा. जुने भामपूर या 7 जणांनी एकत्रित येऊन संगनमताने राहुल यास मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली तसेच घराच्या खोलीत डांबून ठेवले. याप्रकरणी राहुल पाटील याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील 7 जणांविरुध्द भादंवि कलम 143, 147, 342, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

बालकासह विवाहिता बेपत्ता
शिरपूर-वरवाडे येथील रहिवासी नीता नीलेश मराठे (29) ही विवाहिता दि.1 रोजी सकाळी 9 वाजता कोणास काहीही एक न सांगता मुलगा तेजस नीलेश मराठे (2वर्षे) यास सोबत घेऊन कुठेतरी निघून गेली आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिचा भाऊ मुकेश भिला मराठे याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन दोघे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वे अपघातात तरुण ठार
दोंडाईचा-विखरण गावाच्या दरम्यान दि.4 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सुनील कुंदन नेतलेकर (30) रा. दोंडाईचा, ता. शिंदखेडा हा तरुण रेल्वे अपघातात ठार झाला. याप्रकरणी राजेंद्र बुधा पाटील यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.