सामाजिक वनीकरण विभागाचे होतेय दुर्लक्ष
बोदवड । राज्य शासनातर्फे वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले परंतु शेलवड ते शेलवड फाटा ते पळासखेडे बु॥ च्या मार्गावर दुतर्फा सामाजिक वनीकरण खात्याने वृक्ष लागवड केली आहे. याच रस्त्याच्या बाजुने रिलायन्स जिओ कंपनीद्वारा ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू असून हे खोदकाम पोकलेनद्वारा करण्यात येत आहे. जेसीबी मशिनच्या सहाय्याने चारी बुजण्याचे काम केले जात आहे मात्र यात हजारो वृक्ष नष्ट झाले असून वृक्ष लागवड योजनेची ऐशीतैशी झाली आहे. यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकार्यांनीसुध्दा याकडे दुर्लक्ष केले असून वृक्षप्रेमींमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वृक्ष संवर्धनाबाबत केली जाते टाळाटाळ
तालुक्यात रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड या कंपनीचे ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी जामठी, येवती, रेवती, शेलवड व पळासखेडे बु॥ रस्ता प्रजिमा क्रमांक 47 च्या दुतर्फा केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु आहे. यासाठी पोकलॅन मशिनचा वापर केला जात असून ते बुजण्यासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुस सामाजिक वनीकरणकडून हजारो वृक्षांची लागवड केली आहे. या खोदकामामुळे हजारो वृक्ष नष्ट झाली आहे. गेल्या वर्षीसुध्दा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने वृक्ष लागवड केली होती. एकीकडे शासनाकडून वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो मात्र खोदकामासाठी परवानगी देतांना वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात वनरक्षक पातोंड यांच्याशी संपर्क साधला असता खोदकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग जळगावतर्फे परवानगी देण्यात आली आहे. परंतु माहिती तंत्रज्ञान संचलनालय, सामान्य प्रशासन विभाग यांचे पत्रात रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष बचाव संदर्भात काही उल्लेख नसल्याचे सांगितले. याबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून वृक्षप्रेमींकडून जाब विचारला जात आहे.