शेवगेचा लाचखोर ग्रामसेवक धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

सरपंचांकडूनच मागितली 25 हजारांची लाच ; कारवाईने खळबळ

पारोळा- सरपंचांनी केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी सरपंचांकडेच लाच मागणार्‍या तालुक्यातील शेवगे प्र.ब. येथील ग्रामसेवक श्याम पांडुरंग पाटील (रा.संत गुलाबबाबा कॉलनी, पारोळा) यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी एक वाजता पारोळा पंचायत समितीसमोर रंगेहाथ पकडल्याने लाचखोर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सरपंचाकडेच मागितली लाच
तालुक्यातील शेवगे प्र.ब.येथील सरपंच यांनी शेवगे प्र.ब. येथे 2018 रोजी स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शौचालयाचे बांधकाम केले होते. तसेच सन 2019 साली शेवगे प्र.ब. ग्रामपंचायतीमार्फत शेवगे प्र.ब. तांडा येथील विहिरीचे गाळ काढण्याचे काम केले होते. दोन्ही कामांची बिले ग्रामसेवक श्याम पाटील यांनी काढली होती. त्यापोटी श्याम पाटील यांनी तक्रारदार सरपंच यांच्याकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीत 25 हजार रुपये देण्याचे ठरले. यादरम्यान, तक्रारदार सरपंच यांनी याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 27 जून रोजी दुपारी एक वाजता पारोळा पंचायत समितीसमोर असलेल्या गजानन टी सेंटरवर पैसे स्वीकारण्यासाठी सरपंच यांनी शाम पाटील यांना रोख रक्कम दिली. या वेळी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व पथकातील जयंत साळवे, पोलीस नाईक संतोष हिरे, संदीप सरंग, सुधीर सोनवणे यांनी सापळा रचून पैसे स्वीकारताना श्याम पाटील यास रंगेहाथ पकडले.