शेवटच्या टप्प्यात दीपक देसले यांच्याकडे नगराध्यक्षपदाची सूत्रे

0

शिंदखेडा। शिंदखेडा नगर पंचायतीच्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधी शेवटच्या टप्प्यात नगरसेवक दिपक देसले यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. देसले हे माजी प.स.सभापती प्रा.सुरेश देसले यांचे पुतणे आहेत. शिवसेनेचा पाठींबा घेत शहर आघाडीने प्रथम सत्ता काबीज केली. पहिली अडीच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर दोन्ही गट विकासाचा मुद्दा घेवून एकत्र झाले. यानंतर उर्वरीत अडीच वर्षाचा कालावधी 15-15 महिने वाटून घेतला होता. जानेवारी 2018 मध्ये किंवा त्यापूर्वी निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

युती कायम असण्यावर प्रश्नचिन्ह
राज्याचे पर्यटन मंत्री आ.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने शिंदखेडा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाले त्यानंतर जानेवारी 2013 ला सतरा जागांसाठी पहिली सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक झाली. यात प्रा.सुरेश देसले यांच्या शहर विकास आघाडी व माजी सरपंच अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस ,राष्ट्वादी काँग्रेस, मनसेच्या संयुक्त आघाडी व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत होती.त्यात शहर आघाडीला आठ, संयुक्त आघाडीला आठ तर शिवसेनेला एक जागा मिळाली. अखेरच्या टप्प्यात काल शहर विकास आघाडीचे दिपक देसले यांनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतली. सद्यःस्थितीत दोन्ही गट एकत्र असले तरी आगामी निवडणुकीत ही युती कायम राहिल की नाही? हे गट एकमेकांच्या विरोधात असतील हे येणारा काळच ठरवेल.

नगरपंचायतीची सत्ता मिळाल्यानंतर शहरवासियांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. विविध विकासाची कामे केलीत. शहराचा जिव्हाळ्याची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यशस्वी झालो. उर्वरीत कालावधित पाणी योजनेच्या कामाला प्राधान्य दिले जाईल. विकास कामांसाठी पर्यटन मंत्री आ. जयकुमार रावल यांनी विशेष अनमोल मार्गदर्शन केले. माजी प.स.सभापती प्रा.सुरेश देसले , गटनेते अनिल वानखेडे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.  दिपक देसले, नगराध्यक्ष