शेवटच्या शर्यतीत बोल्टला सुवर्णपदकाची हुलकावणी

0

लंडन । सुवर्णपदक जिंकण्यात माहिर असलेल्या जमैकाचा दिग्गज स्प्रिंटर उसैन बोल्टला कारकिर्दीतील शेवटच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. लंडनमधील जागतिक अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत बोल्टने 9.95 सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. 2004 मधील अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या अमेरिकेच्या जस्टिन गॅटलीनने 9.92 सेकंद अशा कामगिरीसह बोल्टला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले. अमेरिकेचाच क्रिस्टियन कोलमॅन (9.94 सेकंद) रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

बोल्टने उपांत्य फेरीत 9.98 सेकंद अशी वेळ नोंदवून दुसर्‍या क्रमांकासह अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यावेळीही कोलमॅननने 9.97 सेकंद अशी कामगिरी करत पहिले स्थान मिळवले होते. अंतिम शर्यतीत खराब सुरुवातीची किमंत बोल्टला मोजावी लागली. अंतिम शर्यतीतील बोल्टच्या प्रतिक्रियेची वेळ 0.183 सेकंद एवढी होती जी शर्यतीतील इतर आठ धावपटूंच्या तुलनेत अत्यंत खराब होती. लंडनमधील याच स्टेडियममध्ये बोल्टने 2012 मधील ऑलिम्पिकमध्ये तिन सुवर्णपदके जिंकली होती. निरोपाच्या शर्यतीत मात्र बोल्टला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. बोल्ट आता 12 ऑगस्ट रोजी होणार्‍या चार बाय 100 मीटर रिले शर्यतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोल्ट त्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावेल, अशी अपेक्षा आहे.

ट्रिपल ट्रिपल
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलग तिसर्‍यांदा ऑलिम्पिकच्या तीन स्पर्धांमध्ये ट्रिपल ट्रिपलचा कारनामा करणारा स्पर्धेच्या 120 वर्षांच्या इतिहासातील बोल्ट एकमेव धावपटू आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिकमधील चार बाय 100 मीटर शर्यतीतील सहकारी नेस्टा कार्टर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी सापडल्यावर ते सुवर्णपदक काढून घेण्यात आले होते. त्यामुळे बोल्टच्या खात्यात नऊपैकी आठच सुवर्णपदके शिल्लक राहिली आहेत. बोल्टने 2008, 2012 आणि 2016 मधील ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर आणि 200 मीटर आणि चार बाय 100 मीटर रिले सुवर्णपदक जिंकले होते.

200 मीटरमध्ये 19.19 सेकंदांचा विक्रम
बोल्टने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 200 मीटरच्या शर्यतीत 19.30 सेकंद अशी वेळ नोंदवून दुसरे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर पुढच्याच जागतिक स्पर्धेत बर्लिनमध्ये परत एकदा आपल्याच विश्‍वविक्रमाला मागे टाकताना 19.19 सेकंदाचा नवीन उच्चांक नोंदवला होता.

बोल्टच्या नावावर 19 सुवर्णपदके
बोल्टने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत महत्वाची अशी 19 सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यात ऑलिम्पिकमधील आठ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील 11 सुवर्णपदके आहेत. याशिवाय त्याने दोन रौप्यपदके आणि एक कांस्यपदकही जिंकले आहे.

100 मीटर 9.58 सेकंदात
बोल्टने 2008 मधील बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 9.69 सेकंद अशा विश्‍वविक्रमासह 100 मीटरच्या शर्यतीतील सुवर्णपदक जिंकले होते. हे त्याचे ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी जागतिक स्पर्धेत बोल्टने आपलाच विश्‍वविक्रम मोडीत काढत 9.58 अशा विक्रमी वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. बोल्टचा हा विश्‍वविक्रम अजून अबाधित आहे.