पुणे : अनधिकृत बांधकाम प्रकरणात नगरसेवक विजय शेवाळे यांचे पद धोक्यात आले असताना महापालिकेत प्रशासनाने दिलेल्या अहवालांची संपूर्ण शहानिशा करून योग्य कारवाई करावी , असा अर्ज तक्रारदार, पीएमटीचे माजी चेअरमन सुधीर काळे यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे .
नवी सदाशिव पेठ343/344 शेवाळे मुलींचे होस्टेल व हॉटेल पुष्पविजय गांजवे चौका जवळ असलेल्या मिळकतीवर शेवाळे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार सुधीर काळे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी केली. आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भात सुनावणी घेतली असता काळे आणि बऱ्हाटे यांचा अर्ज अंशतः मंजूर केला आहे. संबंधित बांधकाम शेवाळे यांच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीतच झाले का? हे तपासण्यासाठी संबंधित प्रकरण कोर्टाकडे पाठविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
संबंधित प्रकरणात शहर अभियंता ,बांधकाम विकास विभागातील कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी जे अहवाल दिले ते नगरसेवक शेवाळे यांना अनुकूल राहातील असे दिल्याचा आरोप काळे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याची संपूर्ण शहानिशा करावी आणि योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी काळे यांनी आयुक्तांकडे केली आहे . कार्यकर्त रविंद्र बऱ्हाटे व माझे कायदेशीर सल्लागार यांच्या सल्ल्यानुसार संबंधित विभागातील अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सुधीर काळे यांनी सांगितले.