शैक्षणिक कागदपत्रांसाठी पालकांची होतेय पायपीट

0

मुक्ताईनगर । तालुक्यातील शैक्षणिक कामासाठी आपल्या पाल्यांचे जात प्रमाणपत्र सेतु विभागाकडे गेल्या तीन महिन्यांपासून पुर्तता करुन दिल्यावरही पालकांना सेतु विभागाची पायपीट करावी लागत आहे. सद्यस्थितीत दहावी व बारावीची परिक्षा सुरु आहे. यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग किंवा इतर शैैक्षणिक कामांसाठी जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर, डोमेसाईल, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांसाठी तहसिल कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. परिक्षेच्या आधी सर्व सर्टिफिकेट गोळा करण्यासाठी पालकांनी अर्ज दाखल केले आहेत.

तीन महिन्यांपासून अर्ज करुनही काम होईना
ऐनवळी सर्टिफिकेटमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून जातीचे दाखले व नॉन क्रिमिलेअरसाठी अगोदरच पालकांनी सेतु विभागाकडे अर्ज दाखल केले आहे. ऐनवेळी सर्टिफिकेट मिळविण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून पालकांनी सेतु विभागामार्फत जातीचे दाखले व नॉन क्रिमिलेअरसाठी केलेले अर्जांची प्रांताधिकारी कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नसून तालुक्यातील पालकांना सर्टिफिकेट आले किंवा नाही यासाठी पैसे खर्च करुन तालुक्यावर येवून सेतु विभागाकडे विचारणा केल्यावर प्रांताधिकार्‍यांकडून सर्टिफिकेट आले नाही म्हणून नैराश्य पत्करावे लागत आहे. सेतु विभागातील संबंधित कर्मचार्‍यांंकडे सर्टिफिकेटविषयी विचारणा केली असता जानेवारी 2017 पासूनचे एकही प्रकरण प्रांताधिकारी कार्यालयाकडून प्राप्त न झाल्याचे नैराश्यजनक उत्तरे ऐकायला मिळत आहे. यातून तहसिल कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालय किती सक्षमतेने काम करीत असल्याचे दृष्य यातून पाहायला मिळते. कार्यालयांच्या या भोंगळ कारभारामुळे पालकांचे हाल होत असून ऐनवेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी दाखले मिळतील कि नाही, अशी तीव्र नाराजी पालकांनी व्यक्त केली आहे. प्रांताधिकारी कार्यालय भुसावळ याठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातील असलेली प्रकरणे त्वरीत मार्गी लावावी व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी जोरदार मागणी तालुक्यातील पालकांनी केली आहे.