शैक्षणिक संस्थांना सरकारची साथ हवी : डॉ. माणिकराव साळुंखे

0

पुणे । व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांना आताच्या उद्योगक्षेत्राशी जोडायचे असेल, तर शैक्षणिक संस्थांच्या प्रयत्नांना सरकारची साथ मिळायला हवी, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी)च्या वतीने इंडस्ट्री, इन्स्स्टिट्यूट पार्टनरशीप समिट-2017 चे उद्घाटन शनिवारी एरंडवणे कॅम्पस येथे झाले. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

50 यशस्वी उद्योजकांचा सत्कार
उद्योजक संजय घोडावत यांना कार्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवार्ड-2017 व शेतीपूरक उद्योगातील यशाबद्दल ए. जे. जामगुंडे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 50 यशस्वी उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी बिल्डिंग ब्रिजेस या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे 1500 व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थी उपस्थित होते. व्यासपीठावर टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचे सरव्यवस्थापक जी. बालनारायण, डॉ. शरद जोशी, आयएमईडी संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, विनायक भोसले उपस्थित होते.

शैक्षणिक पद्धतीत बदल
आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार भारतातील शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातही बदल होत आहेत. उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा आणि व्यवस्थापनशास्त्र अभ्यासाची सांगड घालणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी फक्त उद्योग, शिक्षण क्षेत्राने पुढाकार घेऊन चालणार नाही, शासनाच्या पुढाकाराची जोडही द्यावी लागेल, असे साळुंखे यांनी सांगितले.