शैलजा निकम, विनोद पाटील काँग्रेसचे उमेदवार नाहीच
जिल्हा बँक निवडणूकीत काँग्रेसचे अस्तित्व शून्य ; माजी संचालक राजीव पाटील यांचा गौप्यस्फोट
जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत शैलजा निकम आणि विनोद पाटील हे दोन्ही उमेदवार काँग्रेसचे असल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि आमदार शिरीष चौधरी यांनी केला होता. मात्र हा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव रघुनाथ पाटील यांनी खोडुन काढला आहे. शैलजा निकम आणि विनोद पाटील हे काँग्रेसचे उमेदवार नसून ते पक्षाचे साधे सदस्य देखिल नसल्याचा गौप्यस्फोट राजीव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
जिल्हा बँक निवडणुकीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फुट पडली आहे. काँग्रेसचे नेते डी.जी. पाटील यांनी वेगळी चुल मांडल्यानंतर आता ज्येष्ठ नेते तथा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनीही उमेदवारीवरून जिल्हा नेत्यांसमोर सवाल उपस्थित केले आहे. जिल्हा कॉटन फेडरेशनच्या कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत माहिती देतांना राजीव पाटील यांनी सांगितले की, मी सन 1982 पासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे. 2008 मध्ये जिल्हा बँकेची निवडणूक माजी आ. अरूण पाटील यांच्याविरोधात लढविली होती. याही वेळी मी केवळ अर्ज दाखल केला होता. पक्षाकडे किंवा कुणाकडेही मी उमेदवारी मागितली नव्हती. तरी देखिल मी रावेर विका मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र काही तांत्रिक कारणास्तव हा अर्ज मागे घेऊ शकलो नाही. या काळात काँग्रेसच्या कुठल्याही प्रदेश किंवा जिल्हा नेत्याने माझ्याशी संपर्क साधून मला माघार किंवा निवडणूक लढविण्यासंदर्भात कुठलीही विचारणा केली नाही. मी पक्षाच्या नेत्यांची वाट पाहीली. मात्र काल शैलजा निकम आणि विनोद पाटील यांच्या उमेदवारीबाबत बातम्या वाचल्या. प्रत्यक्षात शैलजा निकम आणि विनोद पाटील हे काँग्रेसचे उमेदवारच नसल्याचा गौप्यस्फोट राजीव पाटील यांनी केला. काँग्रेस विभाजनानंतर शैलजा निकम आणि विनोद पाटील पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा सभांमध्ये दिसले सुध्दा नाही. त्यामुळे आजमितीला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असल्याचा दावा राजीव पाटील यांनी केला आहे.
डॉ. सुरेश पाटलांना ताकद द्यावी
चोपडा विका संस्थेतून काँग्रेसचे विद्यमान संचालक डॉ. सुरेश पाटील यांचा राष्ट्रवादीने अभिमन्यू केल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. या दाव्यावरही बोलतांना राजीव पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादीने जर फसवणूक केली असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी डॉ. सुरेश पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी करून त्यांना निवडून आणले पाहिजे. डॉ. सुरेश पाटील यांचा चोपडा विकातून अर्ज आजही कायम आहे. त्यांना बळ देऊन काँग्रेसची एक जागा निवडून आणावी असे आव्हान त्यांनी दिले.
रणनितीबाबत खुलासा व्हावा
जिल्हा बँक असो की आणखी कुठली निवडणूक असो ती लढवितांना पुर्ण ताकदीनिशी तयारी करावी लागते. जिल्हा बँक ही मोठी संस्था असुन त्याची तयारी देखिल अधिक सुक्ष्मपणे करावी लागते. परंतु स्वबळ, सर्वपक्षीय आणि नंतर महाविकास आघाडीचे पॅनल होइपर्यंत काँग्रेसची रणनिती ठरवितांना नेमके काय घडले याचा खुलासा झाला पाहीजे अशी अपेक्षाही राजीव पाटील यांनी व्यक्त केली. या सर्व प्रकारासंदर्भात आमदार शिरीष चौधरी यांना विचारणा करणार असल्याचेही राजीव पाटील यांनी सांगितले. दरम्यान रावेर विकातून आपण जाहीर माघार घेत असलो तरी इतर मागास प्रवर्गातून उमेदवारी कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे बिनविरोध निश्चीत झालेले संचालक संजय पवार, माजी आ. अरूण पाटील, प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.