भोसरी : पदपथावरील खांबाचे झाकण उघडे असल्याने त्यातून पादचारी तरुणाला शॉक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर रोशन गार्डन समोर घडली. फिर्यादी यांनी शनिवारी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण जाधव (वय 21, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महापालिका विद्युत विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन जाधव असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन जाधव 2 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरून रोशन गार्डन समोरून रस्ता ओलांडत होते. गार्डन समोरील पदपथावरील एका खांबाचे झाकण उघडे होते. तिथे चेतन यांचा हात लागल्याने त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. यामध्ये ते जागीच बेशुद्ध झाले. किरण यांनी त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र चेतन यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावरून पिंपरी-चिंचवड महापालिका विद्युत विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.