जळगाव : गेल्या दीड वर्षांपासून दुकाने आणि आस्थापनांसाठी आवश्यक असलेले नोंदणी दाखले (शॉप ऍक्ट लायसन्स) नवीन काढणे तसेच नूतनीकरण करणे ऑनलाईन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे व्यापार्यांच्या अडचणी अधिक वाढल्या असून काही कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नाही. वारंवार पाठपुरावा करून हि दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी महामंडळाने शनिवारी कामगार अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी हा सावळा गोंधळ लवकरात लवकर दूर करण्याची विनंती करण्यात आली. सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नोंदणी दाखले(शॉप ऍक्ट लायसन्स) नूतनीकरण करणे किंवा नवीन काढण्याची प्रक्रिया दीड वर्षांपासून ऑनलाईन झाली आहे. त्याठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करतांना भाडेकरू असल्यास किंवा मनपाची करार तत्त्वावरील दुकान असल्यास त्यांचा नाहरकत दाखला जोडावा लागतो. परंतु मनपाने नाहरकत दाखला देण्यास नकार दिला आहे तर घरमालकसोबत वाद असेल तर ते देखील नाहरकत दाखला देत नाही. त्यामुळे व्यापार्यांची पंचाईत होत आहे.
राज्यस्तरीय संघटनच्या सदस्यांची उपस्थिती
नोंदणी दाखला नूतनीकरण होत नसल्याने शासनाचा महसूल देखील मोठ्याप्रमाणावर बुडत आहे. व्यापार्यांची राज्यस्तरीय संघटना ’फाम’(मुंबई) मार्फत कामगार आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा करून, भेट घेऊन देखील यावर तोडगा काढण्यात आलेल्या नाही. तरी लवकरात लवकर व्यापार्यांना मदत होईल अशी सुधारणा करावी अशी मागणी व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आली. यावेळी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया, उपाध्यक्ष प्रवीण पगरिया, अनिल कांकरिया, सहसचिव सचिन चोरडिया, पुरुषोत्तम टावरी, सुरेश चिरमाडे, दुकान निरीक्षक एम.डी. चौधरी, ए.एम.सौदागर आदी उपस्थित होते.(फोटो आहे)