शॉर्टसर्किटच्या आगीत विद्यार्थ्यांचे कपडे, पुस्तके मोबाईल खाक

0

जळगाव– शहरातील विवेकानंद नगरातील विश्‍वकर्माय पांचाल मंगल कार्यालयात विद्यार्थी राहत असलेलया खोलीला अचानक शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत दोघा विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाची पुस्तके, कपडे तसेच शैक्षणिक कागदपत्रे खाक झाली आहेत.
विवेकांनद नगरातील जुने विश्‍वकर्माय पांचाल मंगल कार्यालय आहे. या कार्यालयात समाजाच्या मुलांसाठी एक खोली निवासासाठी देण्यात आली आहे. याठिकाणी बोदवड तालुक्यातील शेलवड येथील गणेश मधुकर मेतकर तसेच जामनेर तालुक्यातील देऊळसगाव येथील पवन इंद्रासिंग शिसोदे हे दोन विद्यार्थी राहतात. दोघेही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत आहेत. पवन हा काही कामानिमित्ताने गावाला गेला आहे.

शेजारच्या रहिवाशामुळे प्रकार उघड
गणेश मेतकर हा खोली बंद करुन जवळच असलेल्या महात्मा फुले अभ्यासिकेत गेला होता. शेजारील रहिवासी तडवी यांना अचानक धूर दिसायला लागल्याने त्यांनी अभ्यास करत असलेल्या गणेशला प्रकार कळविला. यानंतर गणेशसह त्याचे अभ्यास करीत असलेले सर्व मित्रांनी खोलीकडे धाव घेतला. काहींनी अग्निशमन कार्यालयात फोन केला. काही वेळातच दाखल बंबाने आग आटोक्यात आली. अचानक लागलेल्या आगीमुळे घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.

कपाटातील कागदपत्रे वाचली
शॉर्टसर्किटने ही आग लागल्याची शक्यता विद्यार्थी गणेश मेतकरने व्यक्त केली आहे. यात त्याच्यासह पवनचे कपडे तसेच खोलीत वरच मोकळ्या जागेत ठेवलेली स्पर्धा परिक्षेची पुस्तके व मोबाईल खाक झाल्याचे गणेशने सांगितले. संस्थेची कागदपत्रे लोखंडी कपाटात ठेवलेली होती, तसेच कपाटातच गणेशने त्याची शैक्षणिक कागदपत्रेही ठेवलेली असल्याने ती वाचली आहे. दरम्यान पवन शिसोदे याची शैक्षणिक कागदपत्रे जळाल्याची शक्यता असून तो गावाहून परतल्यानंतर त्याची शहानिशा होईल, असेही मेतकरने सांगितले.