लाखोंचे नुकसान; प्रशासनाकडून पंचनाम्यास सुरूवात
जळगाव । शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट परिसरात शॉर्टसर्किटमुळे सिंलेडरच्या झालेल्या स्फोटात पार्टेशनचे 14 घरे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास घडली. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांना आग विझविण्याचे काम सुरू करून तत्काळ पोलिसांसह अग्निशमन बंबाला बोलावण्यात आले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे कळते. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट येथे सतीश कंडारे (वय-60), यांचा प्लॉट असून या ठिकाणी पार्टीशनची घरे उभारुन यातील काही घरे चेतन भगत, आत्माराम सोनार, मंगला सोनार, रफिक शेख, शारदा मिसाळ, ज्ञानेश्वर पाटील, संजू मिस्त्री, विष्णू कोळी, ज्ञानेश्वर शिंपी व नरेश बाविस्कर यांना भाडेतत्वावर देण्यात आलेली आहेत. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास चेतन भगत हे राहत असलेल्या घरात शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. घरे पार्टीशानची असल्याने आग तात्काळ पसरली. आगीत घरातील जिवनावश्यक साहित्यासह 14 घरे जळून खाक झाले. आग इतकी भयंकर होती की घरावरची पत्रे, रॅक, पलंग वाकले होते. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.