रावेर- तालुक्यातील मोठा वाघोदा गावातील ईदगाह मैदानाशेजारील कैलास शिवराम पाटील यांच्या मालकिच्या कृष्णा टेन्ट हाऊसच्या गोडावूनला शनिवारी सकाळी आठ वाजता शॉर्टसर्किटने आग लागल्याने मंडपाच्या साहित्यासह शेती अवजारे मिळून तब्बल साडेनऊ लाखांचे नुकसान झाले. या घटनेने पाटील यांच्या मोठे संकट कोसळले असून सावद्यासह फैजपूर येथील बंबांना आगीवर नियंत्रण करण्यासाठी पाचारण करावे लागले. पाटील यांच्या मालकिच्या गोदामात मंडपासाठी लागणारे सर्व साहित्य ठेवण्यात आले होते मात्र सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक गोदामातून आगीचे भयंकर लोळ व प्रचंड धूर दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धावपळ सुरू केली मात्र तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणावर रौद्र रूप धारण केले. आगीत मंडपाचे सुमारे सात लाखांचे साहित्य भस्मसात झाले तर अडीच लाख रुपये किंमतीची शेती अवजारे तसेच अन्य साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. नुकसानीचा पंचनामा तलाठी वानखडे यांनी केला.