शोकाकूल वातावरणात केले अंत्यसंस्कार!

0

निगडी परिसरावर पसरली शोककळा

पिंपरी : भिगवण अपघातात जीव गमावलेल्या गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात यमुनानगरचे नागरिकही शोकसागरात बुडाले आहेत. गायकवाड कुटुंबीयांतील मृत्युमुखी पडलेल्या पाचही जणांचे मृतदेह शनिवारी सकाळी त्यांच्या यमुनानगर येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळील डाळज गावच्या हद्दीत स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटून शुक्रवारी (दि.18) सायंकाळी हा अपघात झाला होता. प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय 67), सुनीता प्रकाश गायकवाड (वय 58), संदीप प्रकाश गायकवाड (वय 40), शीतल संदीप गायकवाड (वय 32), आभिराज संदीप गायकवाड (वय 5, सर्वजण रा. नाना-नानी पार्क, निगडी) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या गायकवाड कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.

या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच सदस्यांचे पार्थिव दोन रुग्णवाहिकांमधून सकाळी त्यांच्या राहत्या घरी यमुनानगरमध्ये आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी साडेदहाच्या सुमारास निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून यमुनानगर परिसरात शोककळा पसरली आहे. अंत्यविधीसाठी निगडी परिसरातील नागरिक गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाले असून अंत्यविधीला असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती.

आजोळी गेल्यामुळे बचावलेल्या या कुटुंबातील सदस्य विश्‍वराजच्या हातून या पाचही सदस्यांना अखेरचे पाणी देण्यात आले. तो आजोळी गेला असल्याने देवदर्शनसाठी गेला नव्हता. मात्र, त्याला आजी, आजोबा, आई, वडील आणि धाकटा भाऊ अभिराज सोडून केल्याने तो पोरका झाला आहे. तर, सर्वांना विश्‍वराजचे चुलत पणजोबा सुभाष गायकवाड यांनी अग्नी दिला.

आई-मुलाला एकाच चितेवर अग्नी
अपघातात एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृत्युमुखी पडले. त्यात शीतल गायकवाड आणि त्यांचा मुलगा आभिराज गायकवाड या दोन्ही मायलेकरांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांवर अंत्यसंस्कार करताना एकाच चितेवर त्यांना अग्नी देण्यात आला. या अपघातात गायकवाड परिवारातील प्रमोद प्रकाश गायकवाड (वय 30) व हेमलता प्रमोद गायकवाड ( वय 28) हे आणखी दोघे जण जखमी झालेले आहेत. त्यापैकी हेमलता गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.