शोध पत्रकारीतेचा लोप ; सकारात्मक बातम्यांच्या वृत्तांकनाची अपेक्षा

0

भुसावळात आमदार संजय सावकारेंचे प्रतिपादन ; भारतीय पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सत्कार

भुसावळ- सोशल मिडीयाचा हल्ली मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे तर दुसरीकडे माध्यमांमधील शोध पत्रकारीता लोप पावत चालली असून स्पर्धेच्या युगातही प्रिंट मिडीयाचे महत्व मात्र अबाधीत असल्याचे मत आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले. भारतीय पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या 19 व्यक्तींचा गौरव पंचायत समिती सभागृहात रविवारी करण्यात आला. प्रसंगी आमदार सावकारे बोलत होते.

आरोपाऐवजी छापावे तथ्य -आमदार
आमदार सावकारे म्हणाले की, पत्रकारांनी सकारात्मक बातम्यांचे वृत्तांकन करण्याची गरज असून अनेकदा पेपरातील बातम्यांमुळेदेखील आंदोलने होतात त्यामुळे आरोप छापण्याऐवजी पत्रकारांनी वस्तूस्थिती छापावी, असे सांगून त्यांनी निर्भीडपणे लिखाण गरजचे गरजेचे असल्याचे सांगितले. गावातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांना घाबरतात तर पोलिस हे प्रसिद्धी माध्यमांना दचकतात, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.

सोशल मिडीयाचा विधायक वापर व्हावा -गजानन राठोड
पत्रकार पोलिसांचे कान, नाक, डोळे असणारा घटक असून अनेकदा चुकादेखील माध्यमांकडून निदर्शनास आणून दिल्या जातात, असे डीवायएसपी गजानन राठोड म्हणाले. भुसावळातील पत्रकारांचे नेटवर्क स्ट्राँग असून अनेकदा त्यांच्यामुळेच आम्हाला घटना-घडामोडी आधी कळतात, असे त्यांनी सांगून सोशल मिडीयाचा वापर विधायक कार्यासाठी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातमीची सत्यता तपासणे गरजेचे -शेखर पाटील
फेक न्यूजचा वापर वाढला असून पत्रकारांनी बातमीची सत्यता तपासणे गरजेचे आहे. डिजिटल मिडीया सर्वत्र पोहोचला असून आता प्रिंट मिडीया आता कागदापुरताच मर्यादीत न राहता स्मार्ट फोनवर येणार असल्याने पत्रकारांवर दुहेरी ओझे येणार आहे, त्यामुळे पत्रकारांनी काळाप्रमाणे बदलणे गरजेचे आहे, असे मत ‘फेकन्यूजचे आव्हान आणि पत्रकारांची भूमिका’ या विषयावर टेक वार्ताचे संपादक शेखर पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
प्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांसह माध्यम क्षेत्रातील 19 प्रतिनिधींचा प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, उपसभापती वंदना उन्हाळे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, डीवायएसपी गजानन राठोड, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, प्रदीप पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात मोहन सरदार यांनी भारतीय पत्रकार महासंघाची भूमिका विषद केली. राजेंद्र चौधरी, संजयसिंग चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार नवलसिंग राजपूत यांनी मानले.

या प्रतिनिधींचा झाला सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 19 व्यक्तींचा गौरव करण्यात आला. त्यात देशदूतचे पत्रकार डॉ.जगदीश पाटील, दैनिक भास्करचे प्रतिनिधी प्रकाश तायडे, हेमंत चौधरी, जी.व्ही.पाटील, योगेश इंगळे, जीवन पांडुरंग महाजन, एस.आर. पाटील, मनोहर झांबरे, खेमचंद पाटील, ललितकुमार फिरके, मंदा निकम, संगीता महाजन, अरुण पाटील, आनंद ठाकरे, संभाजी जाधव, सुनंदा चौधरी, अनिता राजपूत, गिरीश नेमाडे, अंजूम शेख आदींचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत, सचिव प्रदीप पाटील, उपाध्यक्ष प्रकाश सरदार, राकेश कोल्हे, अमोल पाटील, शकील पटेल, रियाज शेख, संभाजी जाधव, राजेंद्र जैन, जितेंद्र काटे, गिरीश नेमाडे, ललित फिरके, मनोहर लोणे, सुनील वानखेडे आदींनी परीश्रम घेतले.