शोध लागला गुन्हेगारांचा अन् गौरव झाला पोलिसांचा

0

भुसावळ: धूम स्टाईल येत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रासह हातातील पर्स लांबवण्याच्या दोन घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानंतर पोलीस प्रशासन टिकेचे धनी ठरले होते. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांनी ही बाब गांभीर्याने घेत डोळ्यात तेल घालून गस्त घालण्याच्या सूचना पोलिसांना करीत गुन्हेगारांचा शोध घेण्याचे बजावले होते. वरीष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनांची डीबी कर्मचार्‍यांनी गंभीर दखल घेत घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्हींचे फुटेज पाहून आरोपींचा फोटो तयार करीत त्यांचा शहरात शोध घेतला व पोलिसांच्या मेहनत फळाला आली. विजय राजू मट्टू (25, न्यू पोर्टर चाळ, भुसावळ) व पॉल विल्सन बर्नाड (22, समता नगर, भुसावळ) या आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी गुन्ह्यांची कबुली देत मुद्देमालही काढून दिला. गुन्हेगारी रोखण्यात यशस्वी ठरलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह डीबी पोलिसांचा पोलीस उपअधीक्षक एल.एस.तडवी यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात गौरवही केला.

यांनी आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या, मुद्देमालही जप्त
पोलीस उपअधीक्षक लतीफ तडवी व शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल पाटील, एएसआय फारूक शेख, एएसआय प्रकाश निकम, नाईक कमलाकर बागुल, विनोद वितकर, विनोद तडवी, समाधान पाटील, वसंत लिंगायत, गजानन देशमुख, चालक जमील शेख आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून दुचाकी (एम.एच.27 बी.जी.7116), चार हजार 500 रुपयांची रोकड, तीन तोळे सोने व सहा रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्या आला.