श्रीनगर – सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान आज जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती. या परिसरात जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळली होती. त्राल भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानूसार 42 राष्ट्रीय रायफलचे जवान, सीआरपीएफच्या 180 बटालीयनचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घातला आहे. जवानांकडून शोध मोहीम राबविण्यात आली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी जवानांनी देखील त्यांना उत्तर देत गोळीबार सुरू केला होता.
शनिवारी (6 एप्रिल) शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. अखेरीस लष्कराने लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. याआधी पुलवामा जिल्ह्यात याच आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याआधी गेल्या आठवड्याच शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते.