इंदूर । होळकर स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरु झालेल्या विदर्भ विरुद्ध दिल्ली या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चर्चा होती ती सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या गौतम गंभीरच्या फलंदाजीची. पण पहिलाच रणजी सामना खेळत असलेल्या आदित्य ठाकरेच्या एका अप्रतिम चेंडूने गंभीरची खेळी संपुष्टात आणली. सामन्याच्या पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात ठाकरे आणि गुरुबानी जणू काही प्रत्येक चेंडूवर विकेट मिळवायची आहे अशीच गोलंदाजी करत होते. गंभीरसह, रणजी करंडक स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार ठरलेला ऋषभ पंत, कुणाल चंडेला यांच्या विकेट मिळवत या दोघांनी दिल्लीची अवस्था 4 बाद 99 अशी केली. पण हिम्मत सिंग आणि धु्रव शोरेयने 105 धावांची भागिदारी करत दिल्लीला अडचणीतून बाहेर काढले. हिम्मतने 66 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दिल्लीने 7 बाद 271 धावांपर्यंत मजल मारली होती धु्रव शोरेय 123 धावांवर खेळत होता. धडाकेबाज धावा करणारा हिम्मत बाद झाल्यावर ध्रुवने विदर्भच्या गोलंदाजीचा व्यवस्थित सामना केला.
ऋषभ पंतने सचिनला मागे टाकले
मध्य प्रदेशची व्यावसायिक राजधानी इंदूरमध्ये सुरु असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्लीने एका दशकानंतर स्थान मिळवले आहे. तर विदर्भ संघाने सगळ्यांना धक्का देत पहिल्यांदाच अंतिम फेरीत स्थान मिळवले. दिल्ली संघाने याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकली होती. गंभीर यावेळी देखील संघात आहे. मात्र दिल्ली संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋषभ पंत सांभाळत आहे. या अगोदर या संघाचा कर्णधार इशांत शर्मा होता मात्र दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध झाला नाही. पहिल्याच दिवशी मैदानात उतरल्यावर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने मोठा विक्रम आपल्या नावे करून घेतला. हा विक्रम धावांचा नाही तर ऋषभ पंतच्या वयाला घेऊन आहे. पंत हा रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारा सगळ्यात कमी वयाचा कर्णधार आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे होता. ऋषभ पंतचे यावेळी वय 20 वर्ष 86 दिवस असे आहे. 1994-95 मध्ये मुंबई संघाचे कर्णधारपद सांभाळले तेव्हा त्याचं वय 21 वर्षे 337 दिवस इतके होते.
पहिल्याच दिवशी वर्चस्व
रणजी करंडक स्पर्धेत लागोपाठ दुसरे शतक झळकवताना ध्रुवने गोलंदाजांना वरचढ होण्याची संधी मिळू दिली नाही. पहिल्या दिवशी वर्चस्व मिळवणार्या विदर्भच्या संघाला दोन झटके बसले आहेत. उपांत्य फेरीत मोल्यवान अशी 81 धावांची खेळी करणार्या सतीशच्या नाकाला दुखापत झाली आहे. तर उपांत्य फेरीच्या लढतीत 12 विकेट्स मिळवणारा गुरबानी टाचेच्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता.