पुणे । ‘शोले’ चित्रपटाचा शेवट एका वेगळ्या दृष्टिकोनातून केला होता. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहिल्यानंतर खूपच हिंसा दाखविण्यात आली आहे. हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले. त्यांनी सूचविलेल्या शेवटाने आम्ही फारसे आनंदी नव्हतो.. पण आम्हाला ते करावे लागले…असा गौप्यस्फोट करीत ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी करीत ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली.पिफमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पिफ फोरममधील राज कपूर पॅव्हेलियन मंचाचे उद्घाटन रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर तसेच रमेश सिप्पी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पिफचे संयोजक डॉ. जब्बार पटेल यांनी सिप्पी यांची मुलाखत घेतली.
सेन्सॉरच्या निर्णयाविरुद्ध दिग्दर्शक लढू शकतात
भारतीय चित्रपटसृष्टीत ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. ‘अरे ओ सांबा कितने आदमी थे’, ‘ये हाथ मुझे दे दे ठाकूर’ हे गब्बरचे संवाद त्याच अमजद खान यांच्या खर्ज्यातील आवाजात सादर करीत शोलेची आठवण त्यांनी ताजी केली. कथानक, वातावरण, ड्रामा याला कुठेही धक्का न लावताही दिग्दर्शकाला अनेक वेगळे प्रयोग चित्रपटामधून करता येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ‘शोले!’ जे प्रेक्षकांनी पूर्वी कधी पाहिले नाही ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु एका वेगळ्या दृष्टिकोनातून बनविलेल्या चित्रपटाचा शेवट बदलला जाणे ही दिग्दर्शकासाठी निराशेची गोष्ट असते. त्याचा सामना मला करावा लागला आहे. त्यामुळे सेन्सॉरशीप लादली जाण्याची बाब काही नवीन नाही. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध दिग्दर्शक नक्कीच लढा देऊ शकतात. मला चित्रपट बनविण्याची कधीच भीती वाटत नाही. दिग्दर्शकाला चित्रपटामधून जे मांडायचे आहे, ते त्याने मांडले पाहिजे.