शोषित व्यवस्थेला टप्प्याटप्प्याने तडा देऊन बळीचे राज्य निर्माण करू

0

पिंपळे गुरव : शेतकर्‍यांच्या लुटीची व्यवस्था हजारो वर्षांपासून प्रस्थापित आहे. त्यामुळे अशा शोषित व्यवस्थेला टप्प्याटप्प्याने तडा देऊन बळीचे राज्य निर्माण करावे लागणार आहे. त्याकरिता अशा लुटारू व्यवस्थेला हद्दपार करण्याकरिता आपणा सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पिंपळे गुरव येथे केले. सुयोग कॉलनीमधील साई सेवा प्रतिष्ठानच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रकाश बालवडकर, खेड तालुकाप्रमुख जयप्रकाश परदेशी, पुणे जिल्हा बैलगाडा संघटनाध्यक्ष अण्णा भेगडे, साई प्रतिष्ठानाचे विश्वस्त प्रकाश ताटे, अ‍ॅड. योगेश पांडे, प्रा. जे. एल. शिंदे, संजय मराठे, श्यामल जगताप, सुवर्णा रेळेकर, सुधाकर राजे उपस्थित होते.

लुटारू व्यवस्थेविरोधात लढाई
राजू शेट्टी पुढे म्हणाले की, शेतीतून बाहेर पडणारी व्यक्ती ही शोषण आणि लूट करणार्‍या व्यवस्थेचा भाग होऊ पाहत आहे. कारण त्या व्यवस्थेबरोबर राहिलो, तरच माझा प्रश्न सुटणार आहे, हे त्याने जाणले आहे. त्यामुळे अशा लुटारू व्यवस्थेच्या विरोधात आपली लढाई आहे. शेतकरी सुध्दा जात, धर्म, भाषा, प्रांत आणि अगदी पिकातही विभागला गेला आहे. कारण जेव्हा कांद्याचा प्रश्न उभा राहतो तेव्हा ऊस उत्पादक त्याच्याकडे कानाडोळा करतो. ऊसाच्या प्रश्नाच्या वेळी कापूस उत्पादक डोळेझाक करतो आणि कापसाच्यावेळी तूर किंवा अगदी बाकीचे सर्वच दुर्लक्ष करीत असल्याची खंत खासदार राजू शेट्टी यांनी बोलावून दाखविली.