शौचालयांना निधीची कमतरता

0

शिरपूर । केंद्र शासनाची व महाराष्ट्र शासनाची महत्वपुर्ण योजना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालय बांधकामावर मोठ्या प्रमाणावर जन जागृती करुन भर दिला जातो. या साठी सरकार युध्द पातळीवर जन जागृती मोहिम राबवित असुन शासन विविध जाहीरात व लोककलांच्या माध्यमाने लोकांची जागृती करुन स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करत आहे. लोकांना शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देऊन प्रोत्साहीत करत आहे. धुळे जिल्हा परिषदेचे नवीन पदभार सांभाळणारे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरण यांनी देखिल धुळे जिल्ह्यात वैयक्तीक शौचालयांचे उद्दिष्ट पुर्तीसाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबादारी सोपवुन ही कामे निर्धारीत वेळे आधी पुर्ण करण्यासाठी वांरवार बैठका घेऊन सुचना केल्या आहेत. त्यांना दर महाचे उद्दिष्ट समोर ठेऊन कामे पुर्ण करण्याचे सुचित केले आहे. तसेच दर आठवड्यास या कामांची समिक्षा देखिल केली जात आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधकाम
प्रशासनाकडून प्रयत्न होतांना दिसत असले तरी वास्तविकता मात्र वेगळीच दिसुन येत आहे. एकीकडे प्रशासन लोकांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहीत करत असुन दुसरीकडे शिरपूर पंचायत समितीच्या ग्रामपंचात विभागात मागील दोन महिन्यांपासुन वैयक्तीक शौचालय बांधकाम करणार्‍यांना देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान शिल्लक नसुन जवळपास 1200 ते 1300 लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम पुर्ण करुन व प्रस्ताव दाखल करुन देखिल निधी अभावी अनुदान रखडले आहे. यासाठी देण्यात येणारे अनुदानाचा निधीच शिल्लक नाही अशी माहिती समोर आली आहे.

अनुदान वेळेवर उपलब्ध व्हावे
यामुळे ग्रामसेवक व सबंधित यंत्रणेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असुन शौचालय बांधकामसाठी पुढे येणार्‍यांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वीपणे पुर्ण करावयाचे असेल तर अनुदान हे वेळेवर व तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अधिकार्‍यांना आदेश करुन बैठका घेऊन उद्दिष्ट साध्य करणार असतील तर यातुन काही साध्य न होता या योजनेच्या अंमलबजावणीस अडचण होऊ शकतात. म्हणुन प्रशासनाने तात्त्काळ हा निधी उपलब्ध करुन अनुदान वितरीत करावे अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.

अनुदान उपलब्ध होणार केव्हा?
यासाठी लाभार्थी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या फेर्‍या मारत असून निधी अभावी अनुदान देता येत नाही असे उत्तर त्यांना देण्यात येत आहे. तालुक्यात जवळपास एक हजार नविन शौचालय बांधकामाचे कामे सुरु असुन ते देखील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. काम पुर्ण करणार्‍यांना देखिल अनुदान वेळेवर उपलब्ध न होत असल्यामुळे नागरीकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. या मुळे लोकांच्या उत्साहात कमी येऊन अभियान देखील थांबले आहे.त् यामुळे योजनेची अंमलबजावणी व उद्दिष्टपुर्ती करावयाची असेल तर लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळणे गरजचे आहे. मात्र निधी अभावी योजना पूर्ण होण्यात अडथळा निर्माण होत आहे.