शिरपूर । शिरपूर तालुक्यातील बलकुवा ग्रृप ग्राम पंचायतमध्ये वैयक्तिक शौचालयासाठी सरकारी अनुदान पंचायत समितीला मिळालेले असतांना हे अनुदान येथील अधिकारी व कर्मचार्यांनी लाभार्थ्यांना न देता परस्पर लुटल्याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून दि.8 ऑगस्ट पर्यंत अनुदान न मिळाल्यास दि.22 ऑगस्टपासून उपोषणास बसण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे येथील गटविकास अधिकार्यांना सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज धोंडू पाटील व माधवराव फुलचंद दोरीक यांनी दिले. या निवेदनावर 70 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.
न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
या निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की, तालुक्यातील बलकुवा येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी सरकारी अनुदान हे पंचायत समितीला मिळाले होते. मात्र पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचार्यांनी ते अनुदान लाभार्थ्यांना न देता परस्पर लुटले आहे. या संदर्भात ग्रामस्थांकडून अनेकदा संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून देखील या पत्र व्यवहाराला केराची टोपली दाखवून अनुदान अद्यापपावेतो मिळालेले नाही. या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषी असलेल्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात ताबडतोब गुन्हा दाखल करावा व 8 ऑगस्ट पर्यंत संबंधितांना अनुदान द्यावे ते न मिळाल्यास दि.22 ऑगस्टपासून शिरपूर येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी दिला आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज धोंडू पाटील व माधवराव फुलचंद दोरीक यांच्यासह 70 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.