शौचालयाचे अनुदान ग्रामसेवकांनी परस्पर खात्यातून काढले

0

अमळनेर।  तालुक्यातील खापरखेडा येथील शौचालय अपूर्ण असतांना ग्रामसेवकांनी परस्पर त्याचे अनुदान खात्यातून काढून घेतल्याचा आरोप करीत चौकशी करण्याबाबत गटविकास अधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे. तक्रारदार विनोद काशिनाथ भिल यांना शौचालय मंजूर करण्यात आले होते. 12 हजार रुपये शासकीय अनुदान द्यावे, परंतु याकडे ग्रामसेवकांनी लक्ष दिले नाही शौचालय बांधले असतांना अनुदान का मिळत नाही, असा आरोप केला आहे.

ठेकेदाराने बांधलेले शौचालय निष्कृष्ट स्वरूपाचे
ग्रामसेवकांनी परस्पर काम दिले असल्यामुळे शौचालय अतिशय निष्कृष्ट स्वरूपाचे बांधण्यात आले आहेत. राजीव गांधी घरकुल 2 योजनेंतर्गत गावातील 7 ते 8 लाभार्थ्यानी एक लाख रुपये अनुदानात शौचालय बांधले असतांना तेच शौचालय शासनाच्या दुसर्‍या योजनेत दाखवून 10 ते 12 हजार रुपये शासकीय अनुदान ग्रामसेवकांच्या मध्यस्थीने लाभ दिल्याची लेखी तक्रार वसंत भिल, रघुनाथ भिल, श्रीराम भिल, राजू भिल, निर्मलाबाई पाटील, गुलाब पाटील, विक्रम पाटील यांनी गटविकास अधिकारी व उपसभापती त्रिवेणीबाई पाटील यांना दिले आहे. याबाबत ग्रामसेवक आर.पी. सनेर यांना विचारणा केली असता सदर तक्रार हि खोटी असून लाभार्थ्यांना पूर्णपणे शासकीय अनुदान मिळाले आहे व ऑनलाईन प्रक्रियेत एका तक्रारदाराची शौचालय बांधकामाची नोंद चुकीने झाल्याने गैरसमज झाला आहे असे सांगितले तर विस्तार अधिकारी एल.टी. चिंचोरे यांना विचारले असता अशी कुठलीही तक्रार माझ्याकडे आली नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.