शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्लॅब खचला!

0

जळगाव । पांझरपोळ परिसरातील जोशीपेठ जवळील सार्वजनिक शौचालयाचा सेफ्टी टँकचा आउटलेटवरील ढापा कोसळून टँकमध्ये चार जण पडले. ही घटना आज सकाळी साडेसहाला घडली. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. तसेच नागरिकांनी पडलेल्या चार जणांना त्वरीत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. महापालिकेने शहरात बांधलेल्या सार्वजनिक शौचालय हे नागरिकांसाठी धोकेदाय बनले आहे. काही महिन्यांपूर्वी हुडको परिसरात एक शाळकरी मुलगा सेफ्टी टँकमध्ये पडून जखमी झाला होता. आज देखील पांझरापोळ येथील एका सार्वजनीक शौचालयाच्या सेफ्टी टँकचा स्लॅब खचल्याने चार जण सहा फुट खोल या टाकीत पडले.

नागरिकांच्या सतर्कतेने वाचले प्राण
अचानक सेफ्टी टँकचा ढापा कोसळल्याने सहा फुट टाकीत चार जण पडल्याने मोठा आवाज झाला. परिसरातील नागिरीकांनी लगेच धाव घेत टाकीत पडलेल्यांचे चार जणांचा केवळ हात दिसत होते. त्यांना लगेच बाहेर काढण्याची तत्पराता दाखविल्या गेल्याने त्यांचे प्राण वाचले. या चार जणांना बाहेर काढण्यास थोडा जरी उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घटना आज घडली असती.

शर्थीच्या प्रयत्नांनी वाचले प्राण
जोशीपेठ भागातील रहिवासी पांझरापोळ चौकात असलेल्या सार्वजनिक शौचालयात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शौचास गेले असता शौचालयाच्या प्रवेशव्दार जवळील सेफ्टी टँकचा आउटलेट वरील ढापा अचानक खचला. यामुळे श्रावण बुधो बारी (वय 72), चेतन जगताप (वय 40) रमेश धुरदेव (वय 42) व हिरा पाटील (वय32 ) रा. दलालवाडा हे चौंघ सहा फुट खोल असलेल्या सेफ्टी टँक मध्ये पडले. याचवेळी शौचालयास आलेल्या इतर नागरिकांनी आरडा-ओरड केल्यानंतर व संबंधित पडलेल्या चारही जणांना शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. पडलेल्यांच्या कमरेला व पायावर जखमा झाल्या होत्या. टँकमध्ये पडलेल्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढून त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर ते घरी परतले. यानंतर व्हॅक्यूम क्लिनरने पाणी ओढण्यात आले. तरुण कुढापा मित्र मंडळाकडून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

30 वर्षे जूने शौचालयाचे बांधकाम
घडलेल्या सार्वजनीक शौचालयाचे बांधकाम हे 30 वर्ष जूने असल्याचे माहिती मिळाली आहे. तसेच 44 खोल्यांचे असलेले हे शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय होती. महापालिकेच्या दुर्लक्षितेमुळे शहरातील अशा अनेक जुन्या शौचालयांची स्थिती आहे. त्यामुळे जुन्या शौचालयांची स्थिती चांगली करावी अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.

मनपाच्या अधिकार्‍यांची तारांबळ
घटना घडल्यावर महापालिकेच्या प्रभाग अधिकारी व कर्मचार्‍यांना कळविण्यात आले. लगेच बांधकाम विभागाचे शहर अभियंता सुनील भोळे, अभियंते सी. एस. सोनगिरे, प्रसाद पुराणिक, मंजुर खान, आरोग्य निरीक्षक श्री लोखंडे यांनी धाव घेतली. परिस्थीतीची माहिती घेत घडलेल्या घटनेच्या ठिकाणावर बँरेकेंटीग केली. तसेच शौचालयाच्या वापरासाठी पर्यायी रस्ता म्हणून शौचालयाची दुसर्‍या बाजूची भिंत पाडून रस्ता केला. तसेच सेफ्टी टँकचा उपसा करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर वाहन बोलवून काम सुरू केले. सेफ्टी टँक पूर्ण खाली झाल्यानंतर बांधकाम करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.