पिंपरी-चिंचवड : एचए कंपनी मैदान परिसरात झोपड्या टाकून राहणारे नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने नेहरूनगर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी उपस्थित केला. त्यावर सार्वजनिक शौचालय पाडणार्यांना शौचालयाचा विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा आरोप स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला. त्यावरून दोघींमध्ये खंडाजगी झाली.
नेहरूनगरात घाणीचे साम्राज्य
महापालिका सभेच्या अजेंड्यावर स्वच्छ भारत अभियानातून उभारल्या जाणार्या शौचालयांच्या कामकाजाचा आढावासंदर्भातील अवलोकनार्थ विषय होता. या प्रस्तावाला अनुसरून डॉ. घोडेकर यांनी नेहरूनगरच्या एचए कंपनीच्या मैदानावर झोपड्या टाकून राहणारे नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचा विषय मांडला. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे तेथील रहिवाशांना त्रास होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
शौचालय पाडणारेच म्हणतात कारवाई करा
महापालिकेचे सार्वजनिक शौचालय पाडणार्यांकडूनच उघड्यावर शौचास जाणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी होत असल्याचा आरोप सावळे यांनी केला. त्याला घोडेकर यांनी ’शब्द जपून वापरा, मी शौचालय पाडले नाही’, असे प्रत्युत्तर दिले. नेहरूनगरमधील शौचालय पाडल्याप्रकरणी अनेक सामाजिक संघटनांनी अर्ज केले असून, त्यानुसार महापालिकेने गुन्हा दाखल केला का, असा सवाल सावळे यांनी उपस्थित केला. तसेच आयुक्तांना खुलासा मागत गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली.
आमच्या नेत्यांचे पाय धरले
’कारवाई करू नये, म्हणून आमच्या नेत्यांचे पाय धरता आणि इकडे आरोप करता’, असा थेट आरोप त्यांनी केला. त्यावरून घोडेकर आणखी भडकल्या. दोघींनी एकमेकींवर जोरदार आगपाखड करत सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृह अवाक् झाले होते.महापौर काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी दोघींना खाली बसण्याचे व शांत राहण्याचे आवाहन केले. माजी महापौर मंगला कदम यांनी घोडेकर यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या दोघींचे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे महापौरांनी चालू विषय मंजूर करून सभा पुढे चालू ठेवली. त्यानंतर दोघीही शांत झाल्या.