भुसावळ । शहरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये हागणदारीमुक्त अभियानांतर्गत 19 वैयक्तिक शौचालयांचे काम पुर्ण करण्यात आले आहे. मात्र पालिका प्रशासनातर्फे या नागरिकांना वैयक्तिक शौचालय अनुदानाचा एकही हप्ता न मिळाल्यामुळे या नागरिकांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरीच्या माध्यमातून रखडलेले अनुदान मिळण्याची मागणी केली.
नागरिकांमध्ये संताप
14 व्या वित्त आयोगातून 50 टक्के रक्कम शौचालयासाठी अनुदान खर्च करण्यासाठी शासनाने आदेश दिलेले आहेत. नगरपालिकेला 2 हजार शौचालयाचे उद्दीष्ठ दिलेले असताना फक्त 500 शौचालयांचे उदिष्ट पुर्ण करण्यात आले आहे. हा गोरगरीबांवर अन्याय होत आहे. एकीकडे उघड्यावर शौचसाठी जाणार्यांवर कारवाईचा धाक दिला जातो. तसेच गुडमॉर्निंग पथकाकडून अशा नागरिकांना गुलाब पुष्प देऊन पालिकेतर्फे गांधिगिरी करण्यात आली होती. तर दुसरीकडे शौचालयाचे अनुदान थांबविले जाते. यास प्रत्युत्तर म्हणून लाभार्थ्यांनी देखील मुख्याधिकार्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. प्रशासनाने लक्ष देऊन अनुदानाची रक्कम मिळण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी पंचशिल नगर, गौतम नगर, भिरुड हॉस्पिटलमागील भाग या नागरिक उपस्थित होते.
वंचित लाभार्थ्यांची नावे
यावेळी चित्रा कोळंबे, विजय चौधरी, रेखा जावळे, बन्सीलाल पाटील, शोभा चौधरी, विनायक नाफडे, श्रीकृष्ण नवले, चंद्रकांत पाचपांडे, मनोज कोलते, जितेंद्र वारके, सुधाकर पाटील, संदिप चौधरी, प्रभाकर पाटील, रामलाल चंदन, सतिश ठोकर, अशोक पाटील, सुलभा टोंगळे, मंगला चौधरी, गजानन पाटील हे लाभार्थी उपस्थित होते.
वैयक्तिक शौचालयांचे 3 हजार 89 अर्ज अपलोड करण्यात आले आहे. त्यात 750 अर्जधारकांना नोटीसा काढण्यात आल्या आहे. 15 तारखेपासून 350 लोकांचे पथक निर्माण करुन हगणदारीमुक्तीसाठी कारवाईची श्रृंखला सुरु करणार आहे. तसेच 3 हजार 89 अर्जांपैकी प्रथम हप्ता 914 लोकांना देण्यात आला आहे. तसेच द्वितीय हप्ता 933 अर्जदारांना देण्यात आला आहे तर तृतीय हप्ता 540 लोकांना देण्यात आला आहे. तरी 750 अर्जदारांना कारवाईची नोटीसा सुध्दा काढण्यात आली आहे.
– बी.टी. बाविस्कर, मुख्याधिकारी