येरवडा । पालिकेच्या वतीने वैयक्तिकरित्या शौचालय बांधून देण्याच्या कामामध्ये अधिकार्यांनीच काम करून देण्यासाठी गोरगरीब जनतेकडून रक्कम लाटली असून क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्यांनी प्रत्येकी 5 हजार रुपये अशापद्धतीने नऊशे नागरिकांकडून रक्कम लाटली असून या प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय परिवर्तन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव डावरे यांनी केली आहे. शहरासह उपनगर भागातील सर्वसामान्य जनतेला शौचालयाच्या मुख्य समस्येला अनेक वर्षांपासून सामोरे जाण्याची वेळ येत आहे.
18 हजारांचा निधी मंजूर
ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय बांधणे नागरिकांना आवाक्या बाहेर असल्याने उघड्यावरच शौचास जाण्याची वेळ येत होती. त्यामुळे स्वच्छ व सुंदर भारत व्हावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने हागणदारी मुक्ती योजना अमलात आणून ही योजना शहर, उपनगर व ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून हा उपक्रम यशस्वी व्हावा. या उद्देशाने केंद्राकडून चार हजार, राज्याकडून 8 हजार व पालिकेच्या वतीने 6 हजार रुपये असा 18 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात राहणार्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे ठरविले आहे. यासाठी अनेक नागरिक क्षेत्रिय कार्यालायात चकरा मारत होते. मात्र अधिकार्यांकडून अशा नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. शासनाच्या वतीने शौचालयासाठी तुम्हाला फुकट निधी मंजूर झाल्याने आम्हाला देखील यात काही लाभ नको का? असे प्रश्नही विचारले जाऊ लागले आहेत. प्रत्येक व्यक्तीमागे क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्यांनी नऊशे नागरिकांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये लाटल्याने या प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप डावरे यांनी केला आहे. मात्र बहुतांश नागरिकांची केलेली कामे ही निकृष्ट दर्जाची झाल्याने एकीकडे अधिकार्यांनी व्यक्तीमागे पैसे लाटल्याने गोरगरीब नागरिकांची अधिकार्याकडून फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुन्हा तेच भ्रष्ट अधिकारी
अनेकांनी कर्ज काढून अधिकार्यांना पैसे दिले आहेत. अशा निकृष्ट दर्जाच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. क्षेत्रिय कार्यालयात असा राजरोसपणे किती भ्रष्टाचार होत असेल हे सांगणे कठीण आहे. येथील एका वरिष्ठ अधिकार्याने 10 वर्षांपूर्वी वडगाव शेरी भागातील सोपानानगर परिसरात बस जात नसताना नकाशात बसशेड दाखवून लाखो रुपयांचा काळाबाजार केला होता. त्यामुळे संबंधित अधिकार्यावर पालिका अधिकार्यांनी पाठराखण करून संबंधित अधिकार्याची बदली केली होती व तेच भ्रष्ट अधिकारी या ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप डावरे यांनी केला आहे.
संबंधित प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून यामध्ये गोरगरीब जनतेची दिशाभूल करून त्यांच्याकडून प्रत्येक व्यक्तीमागे 4 ते 5 हजार रुपये लाटल्याने सदर घटनेबाबत आपण मुख्यमंत्री,पालकमंत्री व पालिका आयुक्तांना निवेदन देणार असून दोषी अधिकार्यावर जर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करून याविरोधात आवाज उठवू.
– सुखदेव डावरे,
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय परिवर्तन संघटना