पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने कासारवाडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ‘पैसे द्या व वापरा’ तत्वावर शौचालय बांधले जाणार आहेत. या सुलभ शौचालयाच्या एकाच प्रकारच्या दोन्ही वेगवेगळ्या कामात तब्बल 41 लाख 9 हजार 146 रुपयांचा फरक आहे. स्थायी समिती सदस्यांनी देखील याची माहिती न घेता दोन्ही विषयांना डोळे झाकून मंजुरी दिली. हा फरक नेमका कोणत्या कारणांमुळे आहे, हे समितीला सांगता देखील आले नाही. सुलभ इंटरनॅशनल संस्थेकडून विद्याविकास शाळा आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत या ठिकाणी ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही ठिकाणी पुरुषांसाठी 10 शौचालये, सहा स्वच्छतागृहे, तर महिलांसाठी सात शौचालये व केअर टेकरसाठी रुम बांधली जाणार आहे.
—
हे देखील वाचा
बेफिकीर सदस्य
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत बांधल्या जाणा-या कामासाठी 51 लाख 85 हजार 525 रुपये खर्च येणार आहे. तर, विद्याविकास शाळेजवळ उभारल्या जाणार्या याच प्रकारच्या सुलभ शौचालयांकरिता 93 लाख 94 हजार 671 रुपयांचा खर्च येणार आहे. दोन्ही ठिकाणी एकसारखेच करण्यात येणार्या कामामध्ये तब्बल 41 लाख 9 हजार 146 रुपयांचा फरक आहे. याबाबत स्थायी समिती सदस्यांना विचारले असता त्यांना या कामातील फरक सांगता आला नाही. त्यांनी कोणतेही माहिती न घेता, डोळे झाकून मान्यता दिली आहे.