येरवडा । महाराज नगररोड क्षेत्रिय कार्यालयांतर्गत महापालिका अधिकारी व कर्मचारी यांनी शौचालयाच्या प्रकरणात लाखो रुपयांचा घोटाळा केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय परिवर्तन संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेसमोर उपोषण करण्यात येत आहे.
देश, शहर व ग्रामीण भागही हागणदारीमुक्त व्हावा. या उद्देशाने स्वच्छ भारत अभियान या उपक्रमांतर्गत केंद्र, राज्य व महापालिकेच्या वतीने ज्या लाभार्थींना शौचालय नाही. अशा लाभार्थीसाठी 4, 8 व 6 हजार रुपये मंजूर करण्यात आले. ही योजना गेल्या एक ते दीड वर्षांत राबविण्यात येत असून नगररोड क्षेत्रिय कार्यालयांतर्गत जवळपास 904 लाभार्थींची या उपक्रमात नोंद आहे. ज्या लाभार्थींना या योजनेचा लाभ झाला अशा व्यक्तींना शासनाच्या वतीने देण्यात येणारी रक्कम न देता उलट त्यांच्याकडूनच प्रत्येक लाभार्थींच्या मागे अधिकार्यांनी 4 ते 5 हजार रुपये लाटले असल्याचा आरोप संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुखदेव डावरे यांनी केला होता.
गोरगरीब जनतेसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र अधिकार्यांनी पदाचा गैरवापर करून व शासनाची फसवणूक करून लाभार्थींकडून 4 ते 5 हजार लाटले लाटले आहेत. लाभार्थींना पालिकेची पावती देणे गरजेचे असताना तसे झालेले नाही. ज्या बँकेत ही रक्कम जमा झाली आहे. त्या बँकेची माहिती अधिकार्यांनी दिलेली नाही. यामध्ये अनेक अधिकारी दोषी असण्याची शक्यता आहे. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असून जोपर्यंत दोषी अधिकार्यांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आपण उपोषण सुरूच ठेवणार आहोत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती डावरे यांनी दिली.
महिन्यानंतरही कारवाई नाही
यामार्फत शौचालयाची कामेदेखील निकृष्ट दर्जाची असल्याचे डावरे यांनी उघडकीस आणले होते. याबाबत डावरे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त वसंत पाटील, अधिकारी विजय दहिभाते यांना निवेदन देऊन झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करून दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र महिना उलटूनही कोणत्याही कारवाई न झाल्याने संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये राकेश वाल्मिकी, सिद्धार्थ कांबळे, सुहास ठोकळ, अॅड. भीमसेन कांबळे, निकिता यादव, सुरया खान, सोनाली कदम, छाया पिल्ले, नंदा यादव आदींनी सहभाग घेतला.