शौचालय बांधकामासाठी सदस्य पुढाकार घेणार

0

जळगाव। शासनाचा स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाचे मोठे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यादृष्टीने प्रशासनाची वाटचाल सुरु आहे. मात्र अद्यापही अनेक गावे हागणदारीमुक्त झालेले नाही. जळगाव तालुका हागणदारीमुक्तीत पिछाडीवर असुन अद्यापर्यत केवळ 40 टक्के काम झाले आहे. 60 टक्के कामे बाकी आहे. शौचालयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समिती सदस्य स्वत पुढाकार घेणार असल्याचा निर्णय पंचायत समिती बैठकीत घेण्यात आला. पंचायत समितीची मासिक बैठक सभापती यमुनाबाई रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी भारी गटविकास अधिकारी डी.एस.चित्ते, उपसभापती शितल पाटील, सदस्य हर्षल पाटील, नंदलाल पाटील, जागृती चौधरी यांच्यासहकर्मचारी उपस्थित होते.

सर्व योजनांचा आढावा: बैठकीत शौचालय, घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. शौचालय व घरकुलांचे काम संथगतीने सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचार्यांवर कुठलाही वचक नसल्याने काम होत नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी आयकार्ड कंम्प्लसरी वापरावे तसेच कर्मचार्यांनी कार्यालयाबाहेर जातांना हालचाल रजिस्टरवर नोंद करावी अश्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

घरोघरी जाणार: अपूर्ण शौचालय व घरकुलांची सन 2009 ते 2015 पर्यंत यादी सदस्यांना देण्यात येणार असून पंचायत समिती सदस्य स्वत लाभार्थ्यांच्या घरी जावून घरकुल व शौचालय बांधण्यास प्रोत्साहीत करणार असून उदिष्ट्य पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. परंतू या योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. यावेळी कृषि विकास अधिकारी मधुकर चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा असे सदस्यांनी सांगितले. यावेळी मधुकर चौधरी यांनी सदस्यांना कृषीविषयक योजनांची माहिती दिली.