शौर्यगाथा शाहिरीतून अजरामर – राजेंद्र घावटे

0
शाहिरी शंभुवंदना कार्यक्रमाचे केले आयोजन
पिंपरी : अनेक शौर्यगाथा शाहिरांनी आपल्या वाणीतून अजरामर केल्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते, साहित्यिक राजेंद्र घावटे यांनी केले. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवांतर्गत शिवप्रेमी कलामंच आणि बालशाहीर जागृती पथक यांनी आयोजित केलेल्या शाहिरी शंभुवंदना या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना घावटे बोलत होते. यावेळी नगरसेवक केशव घोळवे, नगरसेवक तुषार हिंगे, शाहीर चेतन हिंगे, प्रा.सचिन ढोबळे, शिवराज्य संघटनेचे अध्यक्ष अजय जाधव, लोककलावंत मारुती किर्ते, महाराष्ट्र शाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश ढवळे, धाराशिव शाखाध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब काळजे उपस्थित होते. नगरसेवक हिंगे म्हणाले की, ही शाहीरीची कला खूप आनंददायी तसेच स्फुर्तीदायक आहे. शाहिरांच्या आवाजातील कवने देशभक्तीची जाणीव करून देतात.
व्याख्यानांचा सारांश एक कवनातून समजतो
राजेंद्र घावटे पुढे म्हणाले की, मी एका शाहिराचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. शाहिरी परंपरा देशासाठी आवश्यक आहे; कारण आताच्या संभ्रमावस्थेतल्या समाजाला प्रबोधनाची नितांत गरज आहे. ते काम शाहीरच करू शकतात. अनेक व्याख्यानांचा सारांश एका शाहिरी कवनातून मांडता येतो, इतकी ही प्रभावी कला आहे. बालशाहीर अजय शेवाळे, ओंकार, प्रीतम, प्रथमेश यांची कवने उल्लेखनीय होती. इशा बांदिवडेकर या विद्यार्थिनीने सादर केलेले संभाजीचे कवन आणि बालशाहिरा आश्‍लेषाचा शिवजन्माचा दीर्घ पोवाडा लक्षवेधक होता. नरवीर तानाजी यांच्या बलिदानदिनाचे औचित्य साधून युवाशाहीर गुरुराज कुंभार याने ’गड आला पण सिंह गेला’ या पोवाड्याचे दमदार सादरीकरण करून श्रोत्यांना भावविवश केले. शीतल कापशीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश ढवळे यांनी आभार मानले.