शहादा । साने गुरुजींना कृतिशील अभिवादन करण्याच्या हेतूने शहादा येथील युवकांनी एक हजार कुटुंबात श्यामची आई पुस्तक पोहोचविण्याचा संकल्प केला. पूज्य साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर च्या संलग्नित शहादा केंद्राच्या युवा कार्यकर्त्यांनी साने गुरुजी स्मृतिदिनाच्या निमित्ताने येथील महात्मा फुले स्मरकावर अभिवादन सभेचे आयोजन कैलास भावसार, अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा प्रधान सचिव खंडू घोडे, शाखा प्रधान सचिव संतोष महाजन,कार्यवाहक राजेंद्र गुलाले, राजेंद्र शहा उपस्थित होते. साने गुरुजी स्मृतिदिनाच्या निमित्ताने पूज्य साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान,अमलनेरच्या शहादा केंद्राच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सानेगुरुजी लिखित विविध गीतांचे गायन करण्यात आले.त्यानंतर संगीता पाटील व कैलास भावसार यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस हार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.
अनेकांनी व्यक्त केल्या साने गुरूजींबाबत भावना
यावेळी साने गुरुजींबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्र सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य कैलास भावसार यांनी साने गुरुजींनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यांच्या योगदानाची माहिती दिली व आजही साने गुरुजींची शिकवण समाजाला किती उपयुक्त आहे. याबाबत विविध दाखले दिले. त्यानंतर अंनिस कार्यवाहक राजेंद्र गुलाले यांनी समानतेची शिकवण देणार्या साने गुरुजींच्या विचारांचा आज समाजात पराभव होतांना दिसण्याची खंत व्यक्त केली त्यानंतर विनायक सावळे यांनी समाजाला आजही साने गुरुजींच्या प्रेम धर्माची आठवण करून देण्याची आवश्यकता असण्याचे सांगितले. धर्मेश मराठे व भूमी शहा यांनी साने गुरुजी श्रमसंस्कार छावणी अमळनेर येथील आपल्या विविध अनुभवांचे कथन केले. त्यानंतर सर्वांनी गुरुजींना कृतिशील अभिवादन करण्याचा संकल्प करीत शहादा शहरात पुढील वर्षभरात श्यामची आई पुस्तके एक हजार कुटुंबात पोहोचवण्याचा संकल्प केला.
संकल्पाचे परीसरातून कौतूक
वर्षभरात शहादा शहरात ही पुस्तके घरोघरी जाऊन पोहोचविणार आहे. यात युवकांनी आराखडा तयार करून् त्यासाठी शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था व संघटना यांचीही मदत घेतली जाणार आहे. शेवटी ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही गुरुजींची प्रार्थना होऊन अभिवादन सभा झाली. युवकांनी केलेल्या या संकल्पाचे परिसरात कौतुक होत आहे. या सभेच्या यशस्वीतेसाठी विपुल रोकडे, धर्मेश मराठे, भूमी शहा, वर्षा महाजन, भरती पवार, प्रवीण महिरे, प्रदीप केदारे, आरिफ मनियार, विजय बोढरे, गिरीधर बिरारे, संतोष साळवे, हेमंत रोकडे आदींनी परिश्रम घेतले. महात्मा फुले माळी समाज मंडळ यांनी सहकार्य केले.