श्रद्धांजली सभा कोरम अभावी रद्द

0

लोणावळा : माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष स्वर्गीय नरेंद्र दरेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नगरपरिषदेकडून आयोजित करण्यात आलेली विशेष श्रद्धांजली सभा कोरमअभावी रद्द करण्यात आली.

माजी नगरसेवक नरेंद्र दरेकर यांची लोणावळा शहरातील काँग्रेस पक्षाचे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळख होती. काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तुंगार्ली येथील नगरपरिषद सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेला नागरध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक भरत हरपुडे, ब्रिन्दा गनात्रा, अपक्ष नगरसेवक मंदा सोनावणे, राजू बच्चे, काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिर्के, आरोही तळेगावकर, सुवर्णा अकोलकर, संजय घोणे, निखिल कवीश्वर, आरपीआयचे दिलीप दामोधरे तर शिवसेनेचे नगरसेवक माणिक मराठे आणि नितीन अगरवाल हे एवढेच नगरसेवक उपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली असून 26 एप्रिल रोजी सभा पुन्हा घेण्यात येणार आहे. दरम्यान या सभेला काँग्रेसचे नगरसेवक ही पूर्ण संख्येने उपस्थित राहीले नाहीत.