पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डेरासमर्थकांना ठणकावले
नवी दिल्ली : हरियाणा-पंजाबसह देशभरात होत असलेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’मन की बात’ या कार्यक्रमातून चिंता व्यक्त केली. धर्म आणि श्रद्धेच्या नावावर कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच कायदा हातात घेणार्यांना शिक्षा ठोठावण्यात येईल, असे मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा ठणकावले. ‘मन की बात’च्या 36 व्या कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी देशभरात होत असलेल्या हिंसा, स्वच्छता अभियान आणि जन धन योजनेवर भाष्य केले. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या त्याच्या समर्थकांनी पंचकुला परिसरात जाळपोळ केली होती. या हिंसाचारात 36 जणांचा बळी गेला तर 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यावर मोदींनी आपल्या आकाशवाणी भाषणातून भाष्य केले.
न्याय मिळविणे हा प्रत्येकाचा हक्क!
मोदी म्हणाले, एकीकडे संपूर्ण देश उत्सवात बुडालेला असताना देशाच्या एखाद्या भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या तर प्रचंड वेदना होतात. हा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश आहे. त्यामुळे धर्म आणि श्रद्धेच्या नावावर किंवा राजकीय कारणाने कायदा हातात घेऊन होत असलेली हिंसा खपवून घेणार नाही. कोणत्याही पंथाने, समूहाने केलेली हिंसा कोणतेही सरकार खपवून घेणार नाही. सर्वांना कायद्यासमोर झुकावेच लागेल. दोषींना कायदा शिक्षा देईलच, असे मोदी म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले, त्यानुसार सर्वांना न्यायाचा हक्क बहाल केला आहे. न्याय मिळविणे हा आपला हक्कच आहे, असेही ते म्हणाले. महात्मा गांधींचे स्वप्न साकार करण्यासाठी देशवासीयांनी ’स्वच्छता हीच सेवा’ ही मोहीम सुरू करण्याचे आवाहनही मोदींनी केले. गुजरातमध्ये बनासकांठातील पूरबाधित मंदिरांची स्वच्छता केल्याबद्दल जमीयत-उलेमा हिंदच्या कार्यकर्त्यांचे मोदींनी यावेळी कौतूक केले.
गणेशोत्सवाचे श्रेय टिळकांनाच!
आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे श्रेय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनाच दिले. ते म्हणाले, सद्या गणेश चतुर्थीची धूम आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी ही परंपरा सुरु केली. गेल्या सव्वाशे वर्षांपासून अशाप्रकारे गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्व देशवासीयांना या गणेशोत्सवासाठी शुभेच्छा, असेही मोदी म्हणाले. काही दिवसांवर आलेल्या ईद-उल-झुहासाठीही मोदींनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आपण उत्सवांना स्वच्छतेचे प्रतिक बनवू शकतो. सार्वजनिकरित्या स्वच्छता मोहिमा राबविल्या जाव्यात, असेही मोदी म्हणाले.