‘श्रमिक ट्रेन’ मजुरांसाठी मोफतच; रेल्वेचा खुलासा

0

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी विशेष श्रमिक गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र अडचणीत असलेल्या मजुरांकडून रेल्वे तिकीटाचे पैसे आकारत असल्यावरुन विरोधकांकडून टीका झाल्यानंतर रेल्वेकडून प्रवासी मजुरांना कोणतीही तिकीटे विकली जात नसून रेल्वे राज्य सरकारांकडून केवळ खर्चाच्या १५ टक्के रक्कम आकारत असलल्याचा खुलासा रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने रेल्वेतील सूत्रांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. भारतीय रेल्वेकडून श्रमिक गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या गाड्या श्रमिकांना सोडून रिकाम्या परतत आहेत. परतत असताना त्या पूर्णपणे बंद असतात. रेल्वेकडून मजुरांना मोफत जेवण आणि पाण्याची बाटली दिली जाते,’ अशी माहिती देण्यात आली आहे.

सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

स्थलांतरित मजुरांकडून ट्रेन तिकिटाचे पैसे घेण्याच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस या मजुरांचे ट्रेन तिकिटांचे पैसे भरेल असे सोनिया गांधी यांनी जाहीर केले आहे. कामगार आणि मजूर हे आपल्या देशाच्या प्रगतीचे दूत आहेत. जेव्हा आपले सरकार परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोफत हवाई प्रवासाची व्यवस्था करते, गुजरातमधल्या एका कार्यक्रमासाठी वाहतूक आणि भोजनासाठी १०० कोटी रुपये खर्च करते, रेल्वे मंत्रालयाकडून पीएम करोना फंडाला १५१ कोटी रुपयांची देणगी दिली जाते, मग प्रगतीचे दूत असलेल्या स्थलांतरित मजुरांना या कठिण काळात मोफत रेल्वे प्रवास का करु दिला जात नाही असा सवाल सोनिया गांधी यांनी केला आहे.