डॉ. कश्यप यांचे गझल गायन व प्रा. चौधरी यांच्या कविता वाचनाने रंगली मैफिल
भुसावळ – इन्सान बन गया हूँ मैं दिल टूटने के बाद, हम रात में उठ कर रोते हैं जब सारा आलम सोता है अशा डॉ. कश्यप यांच्या एकापेक्षा एक गझल गायनात व प्रा. चौधरी यांच्या श्रावण महिन्याच्या कविता सादरीकरणात रसिकश्रोते मंत्रमुग्ध झाले. ज्ञानासह मनोरंजन गु्रपतर्फे आयोजित ही सुरेल सुरांची श्रावणधारा ज्ञानासह विनोदी संगीतसंध्या मैफिल तब्बल तीन तास बरसली.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी गझल तज्ञ डॉ. मधू खराटे तर प्रमुख पाहुणे संगीता बियाणी, डॉ.शुभांगी राठी होत्या. ग्रुपप्रमुख डॉ.जगदीश पाटील यांनी ग्रुपच्या कार्याचा आढावा घेवून सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. प्रकल्प प्रमुख प्रा. पंकज पाटील यांनी श्रावणधारा संगीतसंध्या आयोजनाचा हेतू सांगितला. डॉ. राठी व बियाणी यांनी एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्यासह विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम ज्ञानासह मनोरंजन गृप करत असल्याचे सांगितले. जीवन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. खराटे म्हणाले की, गझल काव्य प्रकाराचा मूळ गाभाविषय प्रेम असून जीवशिवाचे नाते प्रियकर व प्रेयसी यांच्यातील परिभाषा सांगण्यासाठी संतांनी व गझलकारांनी प्रार्थना गीते गझल काव्य प्रकारात रचली. प्रत्येक व्यक्ती स्वत:ला गझलमध्ये शोधतो. इतर भाषांमधील गझलेनंतर मराठी गझलकारांनी मराठी गझल प्रकारात नवचैतन्य निर्माण केल्याचेही डॉ. खराटे यांनी सांगितले.
श्रावणधारा बरसल्या
धरणगाव येथील कवी प्रा. बी. एन. चौधरी यांनी मी असाच आहे, अंधारली दिवाळी, आठवणी दंगलीच्या या गझल, मानवतेची जात ही कविता तर पीआर गीत, निलकंठेश्वर गीत, आशा गीत, शाळेला निरोप ही गीते गायली. प्रसिद्ध गझलकार व गायक डॉ. रघुनाथ कश्यप यांनी प्यार का खत लिखने में वक्त तो लगता हैं, तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगता हैं, तेरा चेहरा कितना सुहाना लगता हैं, चांदी जैसा रंग हैं तेरा, हमें कोई गम नही था, किसको खबर थी साथ तेरा छूटने के बाद अशा एकापेक्षा एक गझल गायन करून शेवटी तेरी प्यारी प्यारी सूरत को किसीकी नजर ना लगे चष्मेबद्दूर ही गझल महेंद्र कपूर, किशोर कुमार, मुकेश व एस. डी. बर्मन यांच्या आवाजात मिमिक्री सादर केली. त्यांना हार्मोनियमची साथ बियाणी स्कूलमधील संगीत शिक्षक योगेश साळशिंगीकर तर तबला साथ के. नारखेडे विद्यालयातील मनोज कुळकर्णी यांनी दिली. सूत्रसंचालन अमितकुमार पाटील तर आभार शैलेंद्र महाजन यांनी मानले.