भीमाशंकर । सोमवारपासून श्रावणमासारंभ झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शंकराच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्री क्षेत्र भीमाशंकर, बनेेश्वर, सासवडमधील संगमेश्वर मंदिर, भोरमधील नागेेश्वर, जुन्नरमधील कपर्दिकेश्वर, पुरंदरमधील भुलेश्वर ही पुरातन मंदिरे गर्दीने फुलून गेली होती. सर्वत्र हर हर महादेवाचा गजर सुरू होता. शंकराला पांढरे फूल, बेल, दूध अर्पण करून भोलेनाथाची अर्चना केली.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार वृक्षांनी वेढलेल्या जंगलात आंबेगाव व खेड तालुक्याच्या हद्दीवर श्री क्षेत्र भीमाशंकर वसले आहे. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले असून, या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. तसेच भीमाशंकरमधून भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर हे ठिकाण तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनक्षेत्र म्हणून लोकांना आकर्षित करते. निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनिमंदिर, मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर, पायर्यांच्या सुरुवातीला असलेले कळमजाई देवीचे मंदिर ही प्राचीन मंदिरे येथे आहेत.
श्रावणात भरवली जाते यात्रा
श्रावणानिमित्त येथे यात्रा भरविण्यात आली आहे. भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने त्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. ही यात्रा पुरातन काळापासून सुरू आहे. पूर्ण एक महिना दर्शनासाठी भाविकांची येथे गर्दी असते. भीमाशंकर अभयारण्यात येथील हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनीमातेचे मंदिर आहे. जंगलात गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून येथे साक्षीविनायकाचे मंदिर आहे. भोरगिरी येथे कोटेश्वराचे मंदिर आहे. सर्व देवदेवतांची मंदिरे येथे असल्याने आता महिनाभर येथे भाविकांची गर्दी असणार आहे. त्यासाठी ट्रस्टतर्फे विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
संगमेश्वर मंदिर
सासवड येथे कर्हा व भोगावती (चांबळी) नदीच्या संगमावर श्री संगमेश्वराचे मंदिर असून ते पांडवकालीन असल्याची आख्यायिका आहे. नदीकाठावर सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, पांदेश्वर अशी शंकराची मंदिरे आहेत. संगमेश्वर व वटेश्वर मंदिराचे बांधकाम एकमेकांसारखेच आहे. हे भव्य मंदिर आहे. दगडी कासव, खांबावर शिल्पकाम आहे. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कर्हातीर आहे. घाटावर खडकेश्वर मंदिर व सतीची समाधी मंदिरे दिसतात. येथेही श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.
बनेश्वर मंदिर
नसरापूर गावाजवळ बनेश्वराचे प्राचीन मंदिर असून, त्याचे बांधकाम हेमाडपंथी असून, 2 कळस आहेत. कळसाखाली मुख्य मंदिरात 1 व त्याच्यावर 1 असे 2 गाभारे आहेत. गाभार्यात शिवलिंग आहे. या शिवलिंगाची शाळुंका उचलून आतमध्ये हात लावल्यास आतमध्ये पाणी वाहत असून, त्यामध्ये सुमारे दीड फूट खोलीवर एकत्र पाच गुप्त लिंगे हाताला लागतात. मंदिरापुढे मोठा नंदी आहे. त्याच्यावर नगारखान्याची व्यवस्था आहे. मंदिर परिसरात स्वच्छ पाण्याची 3 कुंडे आहेत. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून, तोरण, सभामंडप, गाभारा अशा 3 भागांत आहे.
नागेश्वर मंदिर
भोर शहरापासून 13 किलोमीटरवर आंबवडे गावातील निसर्गरम्य वातावरणात पांडवकालीन नागेश्वराचे मंदिर आहे. या पांडवकालीन मंदिराचा जीर्णोद्धार भोर संस्थानच्या पंतसचिवांनी केला. नागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा कारभार पाहिला जातो. पूर्ण दगडाचे मंदिर असून, दगडी खांबावर मंदिर उभे आहे. जिवंत पाण्याची कुंडे असून, 12 महिने भरून वाहतात. त्याचबरोबर गायमुखही आहे. महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, कार्तिक पौर्णिमेला येथे उत्सव साजरा केला जातो.
कपर्दिकेश्वर
जुन्नर तालुक्यात अनेक पुरातन देवस्थाने व देवालये आहेत. श्रीक्षेत्र ओतूर येथे श्री कपर्दिकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात प्राचीन असे शिवलिंग आहे. ओतूरचे ते ग्रामदैवत असून, नवसाला पावणारे, मनोकामना पूर्ण करणारे दैवत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. कपर्दिकेश्वर मंदिर हे मांडवी नदीकाठी असून, मंदिराजवळ या नदीने चंद्राकृती वळण घेतले आहे. म्हणून या नदीला चंद्रभागेचे महत्त्व प्राप्त झाले आहे. भाविक पहाटे 4 वाजल्यापासून येथे गर्दी करतात. श्रावणी सोमवारी स्वयंभू शिवलिंगावर तांदळाच्या कलात्मक पिंडी असतात. शिवलिंगावर तांदळाची पिंड तिच्यावर परत पिंड एकावर एक अशा असतात. एका पिंडीची उंची 5 फुटांपर्यंत असते. पहिल्यास एक, दुसर्यास दोन, तिसर्यास तीन, चौथ्यास चार, पाचवा सोमवार असेल तर पाच पिंडी असतात. या पिंडीसाठी भाविक रविवारी सायंकाळी वाजतगाजत तांदूळ घेऊन येतात. हे पिंडीचे तांदूळ नवसाचे मनोकामना, इच्छापूर्तीचे असतात. ते पुजार्याकडे पूजा करून सुपूर्त करतात. त्या तांदळाच्या पिंडी असतात.
भुलेश्वर
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वराच्या यात्रेस सुरुवात झाली असून यात्रेची सांगता श्रावणातील शेवटच्या सोमवारी होणार आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची असून मंदिराच्या बांधकामाविषयी कुठेही शिलालेख नाही. परंतु या ठिकाणी असणार्या सप्तमातृकांच्या मूर्तीवरून मंदिर 10 व्या शतकापूर्वीचे असल्याचे वाटते. सभामंडप पार करून पुढे आल्यावर लाकडी दरवाजापुढे एका दगडी चौकटीत मारुतीची मूर्ती दिसते. पुढे दगडी जिना चढून वर आल्यानंतर भव्य दगडी नंदी दिसतो. सूर्याचा पडणारा पहिला किरण शिवलिंगावर पडावा, म्हणून महाकाय नंदीची मान उजवीकडे वळवण्यात आली आहे. नंदीसमोर गाभार्यात भुलेश्वराचे सुंदर असे शिवलिंग दिसते. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. येणारा पर्यटक या ठिकाणी कसा आकर्षक होईल, हे सर्वच विभाग पाहतात. वनविभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वागत कमानी उभारल्या आहेत.
सोमेश्वर
बारामती तालुक्यातील नीरा-बारामती रस्त्यावर करंजे गावामध्ये चिंचेच्या झाडीत द्वापारयुगाच्या खुणा जपणारे सोमेश्वर मंदिर दिसते. या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. या मंदिरात शेकडो वर्षांपासून खरं-खोटं करण्याची तीर्थाची विहीर आहे. आजही या ठिकाणी जमिनीचे वाद, कोर्टातील वाद, पैशाचे व्यवहार, चोरीचा आळ व तंटे मिटतात. राज्यातील अनेक भागांतून या ठिकाणी भाविक येतात. या मंदिरात जाऊन देवाचा गुलाल उचलावा लागतो. आजही संगणकाच्या युगात भक्तांचे पोलीस स्टेशन, न्यायालयाच्या कायद्याबरोबरच देवाच्या कायद्यावरही विश्वास आहे.