आजपासून श्रावण मासाला आरंभ झाला. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्व आहे. चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते. आषाढी अमावस्या दीपपूजन तथा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि वातावरणही बदलते. ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. देवाच्या हातानं खाली येणार्या ’माणिक मोत्यांचं ’ हिरवं स्वप्न फुलू लागतं. शेताच्या बांधावरून ’भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलं रं’ असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्या उभी राहते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतेच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात…माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट… ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दारापाशी तिच्या येरझर्या जणू ’सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया’ या तिच्या भावना व्यक्त करतात…आणि इकडे व्रताची तयारी सुरू झालेली असते.
‘देव दर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत’
महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरूवात होते शिवामूठच्या व्रताने. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. नवविवाहीत महिलांनी पाच वर्षापर्यंत हे व्रत करण्याची परंपरा आहे. अशाच प्रकारे परंपरेने केल्या जाणार्या फासकी व्रतात पसाभर तांदूळ शंकराची पिंड आणि नंदीला वाहतात.
सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष. नववधूसाठी तर खासच. संसारातील सौख्य-प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मराठमोळा पारंपरिक वेशभूषेतला हा महिलांचा समुह श्रावणातल्या सप्तरंगी आणि आनंदमयी वातावरणाचं जणू प्रतिनिधीत्व करतो.
शुक्ल पक्षातमील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नाग बिळातील उंदरांना नष्ट करणारा असल्याने तो शेतकर्यांचा मित्र असतो. म्हणून त्याची पुजा करतात. शुक्ल पक्षातील पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणार्या कोळी बांधवांसाठी हा खास सण. भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाखमोलाची वाटते. शिळसप्तमीची अग्नीदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपाने पुजा झाली की ’गोविंदा आला रे आला..’ चा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते.
श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावस्या. आईच्या हाताचं वाण घेतांना लहानपणी मजा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुर्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. श्रावण संपताना कणसात दाणा भरू लागतो. पीकाची राखण सुरू होते. गावातील मंदिरात सुरू झालेले श्रीगणेशाच्या आरतीचे स्वर शेताच्या बांधापर्यंत पोहोचतात आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिक्षा सुरू होते.
– माधुरी गवांदे
gawandemadhu
@gmail.com