पुणे । श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे !!
या काव्यपंक्तीप्रमाणे श्रावणाच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे. कधी ऊन तर कधी पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत. तर सणवार, व्रतवैकल्याने भरगच्च असा हा पवित्र महिना लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा. अशा या श्रावण महिन्याला सोमवारपासून प्रारंभ होत आहे.
व्रत व सणांची रेलचेल
निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते. या महिन्यात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. यंदा या महिन्याच्या आनंदोत्सवाची सुरूवात शिवामूठ व्रताने होणार आहे. सोमवारी व्रत करून महादेवाचे पूजन केले जाते. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मूठीने धान्य वाहण्यात येते. श्रावणी सोमवारप्रमाणेच श्रावणी मंगळवार, शनिवारसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. मंगळवारी महिला मंगळागौरचे व्रत करतात. तसेच या महिन्यात घरोघरी सत्यनारायणाची पुजाही घातली जाते. तर पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, हरिविजय, जैमिनी अश्वमेध, काशीखंड आदी ग्रंथांचे वाचनही करतात. या महिन्यात विविध सणांची रेलचेल असते. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले असते. या महिन्यात सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी, त्यानंतर रक्षाबंधन, गोकुळाष्टमी येते. सणांना याच महिन्यापासून सुरुवात होत असल्याने बाजाराही फुलून निघतात. त्यामुळे व्यापार्यांमध्येही आनंदाचे वातावरण असते.
शहरातील मंदिरे सजली
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने महादेवाच्या मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी लांबलचक रांगा लागतात. पांढरे फूल, बेल, दुध वाहून भोलेनाथाची अर्चना केली जाते. यासाठी शहरातील शंकराची मंदिरे सज्ज झाली आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध योजना आखण्यात आल्या आहेत. मंदिरे विद्यूत रोषणाई, फुले, रांगोळ्यांनी सजवण्यात आली आहेत. तर काही शिवमंदिरांमध्ये कीर्तन सप्ताहांचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांमध्ये मंगळागौरची लगबग
हा महिना महिलांसाठी खास असतो. दर मंगळवारी महिला पारंपारिक वेश, साजश्रृंगार करून मंगळागौरचे विविध खेळ खेळतात. नाकात नथ, मोठ्या काठाच्या नऊवारी साड्या, गळ्यात मोत्यांची ठुशी अन् कपाळावर चंद्रकोर लावून महिला पारंपारिक वेशभूषेत उखाणे, फुगड्या, झिम्मा असे नानाप्रकाराचे खेळ खेळतात. मंगळागौरच्या पूजेकरीता लागणार्या साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही महिलांनी गर्दी केली आहे.