श्रींच्या मिरवणुकीसाठी मंडळे सज्ज

0

पुणे । गाजत वाजत आगमन झालेल्या बाप्पांचे बारा दिवसांच्या मुक्कामानंतर मंगळवारी विर्सजन होणार आहे. मंडळे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून उत्साहात व भक्तीमय वातावरणात श्रींचे विसर्जन करण्यासाठी सज्ज झाली आहेत. मानाच्या गणपती मंडळांची व ढोल-ताशा पथकांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या उत्साहाला कोणत्याच प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.

मानाचा पहिला कसबा गणपती
ग्रामदेवता व मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सकाळी 9 वाजता मंडळाच्या सभा मंडपातून निघेल. 10.30 वाजता मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते श्रींना पुष्पहार अर्पण करून प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरुवात होईल. विसर्जन मिरवणुकीत रमणबाग प्रशालेचे ढोल पथक, आर्ट ऑफ लिव्हींगचे पथक, कामयानी विद्या मंदिर, प्रभात ब्रास बॅन्डचा सहभाग असणार. परंपरेप्रमाणे पालखीतून मिरवणूक निघणार आहे.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजात मंडई येथील टिळक पुतळ्यापासून निघेल. बाप्पा पालखीतून निघणार आहेत. मिरवणूकीत सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यु गंधर्व ब्रास बॅन्ड, शिवमुद्रा ढोल ताशा पथक, ताल ढोल ताशा पथक, शौर्य ढोल-ताशा पथक, अश्व पथक, सिंबायोसिस ईशान्य केंद्राच्या पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थी लोककला सादर करणार आहेत.

मानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपती
गुरूजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात सकाळी 10.30 वाजता टिळक पुतळ्यापासून सुरुवात होईल. जयंत नगरकर यांचे यांचे नगारावादन, अतुल बेहरे यांचे नादब्रम्ह ढोल ताशा पथक, चेतक ढोल ताशा पथक, शिवगर्जना ढोल ताशा पथक मिरणुकीत सहभागी होणार आहेत. सुभाष सरपाळे व स्वप्निल सपकाळे यांनी तयार केलेल्या फुलांच्या रथात श्रींची मुर्ती विराजमान होणार आहे.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाच्या मिरवणुकीला 10.30 वाजता टिळक पुतळ्यापासून सुरुवात होईल. लोणकर बंधुचे नगारावादन, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकांचा यात समावेश असणार आहे. गरुडाच्या आकाराच्या फुलांच्या आकर्षक रथात श्रींची मूर्ती विराजमान असणार आहे.

मानाचा पाचवा केसरी गणपती
मानाचा पाचवा गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी 10.30 वाजता मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल. मिरवणुकीत प्रताप बिडवे यांचे सनई चौघडा वादन होणार आहे. श्रीराम, शिवमुद्रा ढोल ताशा पथक यात सहभागी असणार आहेत.