भुसावळ : लाडक्या गणरायाचे शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी शहरात मोठ्या उत्साहात आगमन झाल्यानंतर गणरायांच्या स्वागतासाठी आसमंतही सरसावल्याचे चित्र शहरात दिसून आले. दिवसभरात मुहूर्तावर खाजगी व सार्वजनिक मंडळांनी श्रींची विधीवत स्थापना केली. शहर आणि बाजारपेठ पोलिस ठाणे व तालुका पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 144 मंडळांतर्फे गणेशाची विधीवत पूजन करून स्थापना करण्यात आली. शहरातील बाजारपेठेत भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. श्रींच्या मूर्ती खरेदीपासून मोदक, दुर्वा, पूजा, केळीचे खांब, फळे घेण्यासाठी भाविकांची लगबग होती. पूजेच्या साहित्यासह सजावटीचे साहित्य खरेदी करण्यात आले तर रात्री उशिरापर्यंत सजावटीचे काम पूर्ण करण्यात आले.
पोलिसांची उत्सवावर करडी नजर
उत्सवात कुठलाही गैरप्रकार न होण्यासाठी पोलिसांनी शहरात गस्त वाढवली आहे. बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी शहरातील बाजारपेठेसह विविध गणेश मंडळांना भेटी देऊन सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या पदाधिकार्यांना सूचना केल्यात तसेच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही निरीक्षक प्रताप इंगळे व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत निरीक्षक विलास शेंडे यांनीही गणेश मंडळांना भेटी दिल्यात. शहरात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासूनच पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली तसेच शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले.
आमदार संजय सावकारे यांच्या निवासस्थानीही स्थापना
कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली असलीतरी कोरोनाचे संकट मात्र कायम आहे. शहरासह देशावरील कोरोनाचे संकट मिटावे, सर्वत्र सुख-शांती समाधानाचे वातावरण रहावे, बळीराजाला सुगीचे दिवस यावेत, असे साकडे विघ्नहर्त्या चरणी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी घातले. शुक्रवारी आमदारांच्या निवासस्थानी शाडू मातीच्या गणरायाची स्थापना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली. आमदार संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याहस्ते श्रींची पूजा-अर्चा करण्यात आली. प्रसंगी कन्या सुनिधी सावकारे व आई सुशीलाबाई सावकारे उपस्थित होत्या.
गणपती बाप्पा मोरयाचा घोष
यंदा कोरोनाचे संकट काही अंशी दूर झाले असल्याने गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. शुक्रवारी गणपती घरी नेतांना गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करताना भाविक दिसून आले. दुचाकी, कार, रीक्षाद्वारे भाविकांनी तर काही जणांनी डोक्यावर गणेशाची मूर्ती ठेऊन गणरायाला घरी नेले.