‘श्रीं’च्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज!

0

पुणे । वर्षभरापासून वाट पाहत असलेल्या गणरायाचे आगमन होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया.. मगंलमूर्ती मोरया’च्या जयघोषात न्हाऊन निघायला संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. यंदा पुण्याच्या गणेशोत्सव शतकोत्तर वर्ष साजरा करत असून बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण पुण्यनगरी सजली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये कामे पूर्ण करण्यासाठी लगबग पाहायला मिळत होती. तर घरोघरी बाप्पाच्या सजावटीत मग्न झाले होते. पूजा, अर्चना, होम-हवन यांमुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

कसबा गणपती
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती. सकाळी 9 वाजता कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून शुक्रवारी मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीत देवळणकर बंधूंचे नगारा वादन, आदिमाया, श्रीराम, नवीन मराठी शाळेचे लेझीम पथक सहभागी होणार आहे. तसेच मिरवणुकीत प्रभात बँडही असणार आहे. सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल. पौरोहित्य राहुल गुरुजी करणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.
– वेळ-स. 11 वा. 56

तांबडी जोगेश्वरी
मानाच्या दुसर्‍या तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक मंदार लॉज जवळून सकाळी 10.30 वाजता निघणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे चांदीच्या पालखीत श्रींची विलोभनीय मूर्ती विराजमान असणार आहे. समीर शहा यांच्या हस्ते दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सतीश आढाव यांचे नगारा वादन, न्यू गंधर्व बँड आणि शिवमुद्राचे ढोलताशा पथक यांचे वादन होणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली.
– वेळ- दु. 1 वा. 15

गुरुजी तालीम
गणपती चौकातून सकाळी 10 वाजता मानाच्या तिसर्‍या गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. अंजली, सुकेन शहा यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होईल. जयंत नगरकर यांचे नगारावादन मिरवणुकीची शोभा वाढवणार आहे. नादब्रह्मचे महिलांचे पथक, गुरुजी प्रतिष्ठान, गर्जना पथक, शिवगर्जना ही पथके सहभागी होणार आहेत. पौराहित्य खांडेकर गुरुजी करणार आहेत. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंचधातूची मूर्ती आणि चांदीच्या पालखीचे अनावरण होणार असून, प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याच्या हस्ते श्रींची आरती होणार आहे.
– वेळ – दु.12 वा 45

तुळशीबाग
मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी वाजता ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल. मिरवणुकीमध्ये नादब्रह्म, नूमवि, उगम, श्रीमहादुर्ग ही ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे. दरम्यान, लोणकर बंधूंचे नगारावादन असेल. पौरोहित्य चिंतामणी जोशी करणार आहेत.
– वेळ – दु. 12 वा. 30

केसरीवाडा
बिडवे बंधूंचे सनईवादन, श्रीराम पथकाचे ढोल-ताशाच्या निनादात मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे. केसरीवाड्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल. प्रशांत कुलकर्णी पौरोहित्य करतील.
– वेळ – स. 10

भाऊसाहेब रंगारी गणपती
भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीच्या मिरवणुकीस शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीत शिवछत्रपती, समर्थ, श्रीराम, उगम या पथकांचे वादन भाविकांना मंत्रमुग्ध करणार आहे. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे रथाचे सारथ्य करतील. त्यांच्याच हस्ते सकाळी 11 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल.
– वेळ – स. 11

मंडईचा शारदा-गणेश
रंगिबेरंगी आर्कषक फुलांनी सजवलेल्या रथात अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाच्या मिरवणुकीस सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. नूमवि मुलींच्या प्रशालेचे पथक आणि गंधाक्ष ढोल पथक मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. दुपारी साडेबारा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा होईल.
– वेळ – दु. 12 वा.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
पुणेकरांचा श्रद्धास्थान असलेला व नवसाला पावतो अशी ख्याती असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या श्रींच्या मिरवणुकीस सकाळी आठ वाजता प्रारंभ होईल. मिरवणुकीत देवळणकर बंधूंचे नगारावादन, दामिनी पथक, गायकवाड बंधूंचे सनईवादन, प्रभात आणि दरबार बँड असेल. सकाळी 10.09 वाजता गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. अशी माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली.
– वेळ – स. 10 वा. 9

स्वागतासाठी आतूर
यंदा गणेशोत्सव तब्बल 12 दिवसांचा असल्याने लहान मुले व तरुणांमध्येही एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात उत्साह संचारला आहे. पुढील बारा दिवस उत्साहाचे आणि चैतन्याचे असल्याने भाविकांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. मानाचे पाच गणपती म्हणजे पुण्याचे वैभव आहे. त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ, भाऊ रंगारी आणि मंडईचा शारदा गणपती हे पुणेकरांचे श्रद्धास्थान आहेत. सार्वजनिक मंडळांबरोबर घरगुती गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सर्वजण बाप्पाच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत.