श्रीकांतला नमवून प्रणिथ सिंगापूर ओपनचा ‘किंग’

0

सिंगापूर : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का देत बी.साईप्रणिथने विजेतेपदावर कब्जा केला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत वरचढ असलेल्या श्रीकांतला मात देत प्रणिथने विजय साकार केला. दोघेही भारतीय बॅडमिंटनपटू आमनेसामने आल्याने खास ठरलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साईप्रणिथने श्रीकांतवर 17-21, 21-17, 21-12 अशी मात केली.

दोन्ही भारतीय खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने ही लढत अटीतटीची झाली. चुरशीच्या झालेल्या पहिल्या गेममध्ये किदम्बी श्रीकांतने साईप्रणिथची झुंज 21-17 अशा फरकाने मोडून काढत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही दोनी बॅडमिंटनपटूंमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. एकेक पॉईंट मिळण्यासाठी साईप्रणिथ आणि श्रीकांत एकमेकांची परीक्षा घेत होते. दरम्यान श्रीकांतने घेतलेली मोठी आघाडी मोडून काढत साईप्रणिथने सामन्यात पुनरागमन केले. अखेर या गेममध्ये साईप्रणिथ वरचढ ठरला आणि त्याने श्रीकांतला 21-17 अशी मात दिली. त्यानंतर तिसऱ्या गेममध्ये साईप्रणिथने श्रीकांतवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्याने गेमच्या पूर्वार्धातच श्रीकांवर 11-5 अशी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी 21-12 अशी वाढवत विजेतेपदावर कब्जा केला.