नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात भाजपने मुख्यमंत्रिपदावर योगी आदित्यनाथ यांची निवड केली. यानंतर योगी आदित्यनाथ यानी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यातलाच एक निर्णय म्हणजे महिलांची छेडछाड रोखण्यासाठी अँटी रोमिओ पथक स्थापन करणे. अँटी रोमिओ पथक स्थापन केल्यानंतर या मोहिमेचं काहींनी कौतुक केलं तर काहींनी टीका केली. उत्तर प्रदेशमधील अँटी रोमिओ पथकावरुन सुरु झालेला वाद अजुनही सुरुच असल्याचं पहायला मिळत आहेत.
प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरुन अँटी रोमिओ पथकावर टीका केली आहे. मात्र, ही टीका करताना प्रशांत भूषण यांनी भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा उल्लेख केल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, श्रीकृष्णाने महिलांची छेडछाड केली होती, प्रभू श्रीकृष्ण हे छेड काढण्यासाठी ओळखले जायचे. मग आता योगी आदित्यनाथ या पथकाचे नाव अँटी कृष्ण पथक असे ठेवणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खुले आव्हान देत प्रशांत भूषण यांनी सुरू केलेल्या रोड रोमियोंविरोधातील मोहिमेवर टीका केली आहे. रोमियोने आपल्या संपूर्ण जीवनात एकाच मुलीवर प्रेम केले. पण श्रीकृष्ण तर तरुणींच्या छेडछाडीसाठी प्रसिद्ध होते. असेही प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. प्रशांत भूषण यांनी केलेल्या ट्विटनंतर ट्विटर यूझर्सने त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. तुमच्या कोर्टात श्रीकृष्ण छेड काढणारे असतील, पण अनेकांच्या मनात ते श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे असे एका युजरने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशात महिलांची छेडछाड रोखण्यासाठी अँटी रोमिओ पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. प्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या एका प्रसिद्ध नाटकातील रोमियो हे एक पात्र आहे. तसंच रोमियो-ज्युलिएटची कथा ही प्रेम आणि त्यागावर आधारीत आहे. यामुळे ङ्गअँटी रोमियो स्क्वॉडफ असे नाव देण्याला अनेकांनी विरोध केला आहे.